कामचुकार अधिकाऱ्यांना वेंगुर्ले पंचायत समितीचा इशारा; गैरहजेरी सहन केली जाणार नाही – सभापती शंकर घारे
चार वर्षांनंतर झालेल्या पहिल्या मासिक सभेत विविध विकास विषयांवर चर्चा; वीज, पाणी, शिक्षण व एसटी फेऱ्यांवर ठोस निर्णय
वेंगुर्ले
कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांनी दिला. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामात तातडीने सुधारणा करून एक टीम म्हणून तालुक्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी पहिल्याच मासिक सभेत केले.
चार वर्षांनंतर पार पडलेल्या वेंगुर्ले पंचायत समितीच्या या पहिल्या मासिक सभेला बॅ. नाथ पै सभागृहात नूतन सभापती शंकर घारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात वीज वाहिन्या टाकताना रस्त्यांची खोदाई केली जाते, मात्र खड्डे महिनोन्महिने तसेच ठेवले जात असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. विशेष म्हणजे, पहिल्याच बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांनी संताप व्यक्त करत, यापुढे उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना सभेत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही दिला.
सभेत विविध विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी प्रशासकीय कालावधीत झालेल्या कामांचा आढावा सादर केला. कृषी विभागाने उभारलेल्या ४०४ वनराई बंधाऱ्यांबद्दल सदस्य नितीन मांजरेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
शिक्षण विभागाच्या चर्चेत स्थानिक शिक्षकांना पदोन्नतीनंतर जिल्ह्यातच ठेवण्याची मागणी सुचिता वजराटकर यांनी केली. तसेच शून्य शिक्षकी शाळांकडे लक्ष देण्याचेही ठरले. आरोग्य विभागात आडेली येथील ड्रेनेज समस्या आणि शिरोडा केरवाडी भागात नळाच्या पाण्यात जिवंत मासे आढळण्याच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना प्रियांका घाटवळ यांनी केल्या.
वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात ग्रामीण भागातील बंद असलेल्या एसटी फेऱ्यांचा मुद्दा चर्चेत आला. भारमान नसल्यामुळे फेऱ्या बंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर पर्याय म्हणून वेंगुर्ले डेपोसाठी मिनी बस सुरू करण्याबाबतचा ठराव शासनाकडे पाठवण्याचे निश्चित करण्यात आले.
या सभेला उपसभापती सचिन देसाई, सदस्य आपी फणसेकर, संकेत धुरी, नितीन मांजरेकर, सुमती मसुरकर-परब, प्रियांका घाटवळ, साक्षी नार्वेकर, सुचिता वजराटकर, शितल राऊत तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
