You are currently viewing कुडाळमध्ये ‘सिंधु सरस’ प्रदर्शनात जिल्हाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळमध्ये ‘सिंधु सरस’ प्रदर्शनात जिल्हाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक; ‘चिमणी पाखरं’ संस्थेच्या नृत्याने रंगली संध्या

कुडाळ (प्रतिनिधी) :

कुडाळात जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित मिनी व जिल्हास्तरीय ‘सिंधु सरस’ स्वयं सहाय्यता समूह उत्पादन विक्री व प्रदर्शन २०२६ मध्ये जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या उपस्थितीने एक वेगळीच रंगत आणली.

प्रदर्शनाचा तिसरा दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे विशेष ठरला. त्यांनी संपूर्ण संध्याकाळ प्रदर्शनासाठी दिली. यावेळी त्यांनी बचत गटातील महिलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महिलांच्या आग्रहास्तव त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय ‘चिमणी पाखरं’ या नृत्य संस्थेच्या कार्यक्रमाचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला. एवढेच नव्हे तर कलाकारांच्या आग्रहास्तव त्या स्वतः स्टेजवर जाऊन नृत्यात सहभागी झाल्या. त्यांच्या सहज आणि मनमिळावू स्वभावामुळे उपस्थितांची मने जिंकली आणि संपूर्ण वातावरण भारावून गेले.

याप्रसंगी त्यांनी ‘सिंधु सरस’च्या उत्कृष्ट आयोजनाचे विशेष कौतुक केले. सांगली जिल्हा परिषदेत प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असताना भरवलेल्या ‘सरस’ प्रदर्शनाच्या आठवणीही त्यांनी यावेळी जागवल्या. यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक श्रीमती घाणेकर यांचीही उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मनस्वी सहभागामुळे कलाकार, बचत गटांच्या महिला आणि उपस्थित अधिकारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा