*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*चैत्रमास*
मास आला चैत्र मांगल्य घेऊन. वसंतासवे रंगोत्सव घेऊन.चैतन्य , मांगल्य, ऊत्साह यांच्यासह आला ऋतूराज वसंत.
आपल्या सणवार, ऊत्सव, यात्रा, जत्रा इ. ऋतू, हवामान, पिके, कापणीचा हंगाम इ. चा विचार करूनच या परंपरा चालत आलेल्या आहेत.
आता चैत्र मास, आणि वसंत यांची जोडी निसर्गात रंगपंचमीचा बहार ऊडवून देईल.
गहू, हरभरा, मिरची, कापूस, ऊस, नवागुळ, तीळ इ. पिकांची कापणी सुरू आहे.
बळीराजा खुशीत आहे.
होळीच्या सणात जूने सारे अर्पण करून नव्या चैतन्याची, आशेची ऊमेदीची सुरवात करून आनंद लुटायचा आहे.
मराठी हिंदू वर्षाचा पहिलाच सण … गुढीपाडवा..हा साजरा होतो.
अंगणे, ऊंबरठे स्वच्छ होऊन रांगोळ्या, चैत्रांगणाने सजतात. दारी पिवळ्या झेंडूचे शुभ मंगल असे तोरण लटकवले जाते.
सुप्रभातीच वेळूच्या काठीवर जरीवस्त्र, साखरीमाळ, हार गजरे, द्राक्षमाळ, कडूलिंब, इ. ने सजवून वर एक चांदीची छोटी लोटी कलश म्हणुन ऊलटी बांधतात. हे सारे शहरात खिडकीतुन, गावात अंगणात ऊंच ऊभारतात. खाली रांगोळी, पूजा, दिवा इ. मांडतात. नैवेद्य करतात. घरात मिष्टान्नाचे भोजन करतात असं हे नव वर्षाचे स्वागत घरोघरी करतात.
हिला …. गुढी… म्हणतात. म्हणजे हिंदूधर्माची विजयी पताका.. ध्वज.
नववर्षाचे स्वागत असे ऊंच गुढी ऊभारून करतात. संध्याकाळी ती ऊतरवून ठेवतात.
कडूलिंब हा कडू असतो. कडवट आठवणी, सोशिकपणा, आरोग्यदायी, असा हा कडूरस शेवट सुखांत आनंदात करतो.
श्रीराम याच दिवशी वनवासातुन परत अयोद्धेत आले. तो आनंद असा आपली अयोद्ध्यानगरी सजवून प्रजेने साजरा केला. रांगोळ्या, फुलापानांच्या कमानी, ऊंच सजलेल्या रंगित गुढ्या, नटलेली प्रजा. घरोघरी मिष्टान्ने नाच गाणी. असा ऊत्सव सोहळाच पार पाडला. त्याची आठवण म्हणुन आजही ही गुढीची परंपरा आहे.
शतकसंवत्सराची ही सूरवात आहे.ती साजरी आनंदात होते.
हिंदू धर्मात साडेतीन शुभ मुहूर्त धरले आहेत. कोणत्याही शुभ, मंगल कार्याची सुरवात या पैकी एका मुहूर्तावर केल्यास कार्य सिद्धीस जाते. त्या साडेतीन मुहूर्तापैकी गुढी पाडवा धरला जातो.
अहंकार, दूराग्रह, वाईट संवयी, वैर तंटे इ. ना विसरून नव्या वर्षाची सुरवात ही ऊंच गुढी करायला शिकवते.
आता वसंत ऋतूचे आगमन होते. सृष्टी नवरंगात सजू लागते. वृक्षवेलींवर जागोजागी चैत्रपालवी हलू लागते. पानगळ संपून नवे धुमारे फुलोरे, फूलू लागतात. हिरवाई वाढते. आरवृक्षावर मोहोर बहरतो. त्याचा सुगंध पसरतो. कोकिळ वसंताचे कूहू कूहू ने स्वागत करते. आंब्यावर बाळकैरी तोरण बांधते. फणस, चिकू, जांब, जांभळे पपया अशी सारी झाडे लेकूरवाळी होतात.
पांगारा, पळस, चांफे लाल चुटूक रंगतात. काटेसावर गुलाबीरंगात तर जाई, जूई, सोनटक्का, मोगरा अनंत शूभ्र रंगात, सोनचाफा सोनसळी तर गुलाब अनेक रंगात, अबोली भगव्या रंगात अशी फुलांचे बहर बहार ऊडवून देतात. रानी वनी निरनिराळ्या रंगात फूलोरे फूलतात. स्वच्छ आकाशात, सकाळी ऊषेचे तर संध्येला सांजरंग फार मोहक दिसतात. जर खाली सागर नदी असेल तर ढगांचे रंग सागरावर पसरतात. शोभा वाढतेच.असा वसंताचा रंगोत्सव आरस्पानी, देखणा बघत रहावा असाच असतो. चैत्राचे हे वैभव म्हणजे रंगपंचमीचाच सोहळा असतो.
आता तृतिया वेगळाच आनंद घेऊन येते.
घरोघरी जाई जूई च्या सजावटीत मखरे सज्ज होतात. त्यात झोपाळ्यावर चैत्रगौरीला मानाने माहेरी आणतात.
तिच्यापुढे लाडू वड्या, लाल कलिंगडे, पिवळी चिबुड टरबूजे, काकड्या पपया आंबा मांडतात. आंब्याची पाने सजवतात. नव्या कैरीचे पन्हे, आंबाडाळ, नारळवडी हरभर्यांची ओटी, जाईचा गजरा, खस अत्तर देऊन स्त्रीयांचा हळदीकूंकू समारंभ फारच हौसेचा असतो. मखरात सजवलेल्या या माहेरवाशीण गौरीला खूप तेज चढते.
असा हा चैत्र सोहळा अक्षयतृतियेला संपतो.
वसंत सरून ऊष्ण तडाखा सोसवेना असा ग्रिष्म येतो.
बहावा पिवळ्या मुंडावळ्या बांधुन हळद लावलेल्या नवरदेवासारखा सजतो. तर लाल चुटूक अग्नी फूलात पानोपानी गुलमोहोर बहरू लागतो.
माघारी फिरणार्या चैत्रगौर, वसंत ऋतू यांना निरोपाच्या फूलांच्या पायघड्या रस्तोरस्ती घातल्या जातात.
आता वैषाख वणवा टिपेला पोचेल, आणि माऊलीच्या दुग्धापरी येणार्या मृगाच्या तुषारांची वाट पहावी लागते.
अनुराधा जोशी.
अंधेरी, मुंबई. 69
9820023605
