जिल्ह्यातील पतसंस्थांचे २३-२४ रोजी अधिवेशन.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे अधिवेशन येत्या २३ व २४ मे रोजी आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली.
पतसंस्थांमध्ये पिग्मी ठेव गोळा करणाऱ्या एजंटांना जवळपास सर्वच संस्था या ३ टक्के कमिशनवर दैनंदिन बचत ठेव गोळा करण्यास प्रतिनिधी नियुक्त करतात. महाराष्ट्र राज्याच्या पतसंस्थांच्या चळवळीमध्ये जवळपास सर्वच संस्था ३ टक्के कमिशन दैनंदिन बचतीवर देत आल्या आहेत. गेल्या ४० ते ५० वर्षामध्ये अशाप्रकारे राज्यभर कमिशनची प्रक्रिया सुरू आहे. परंतु शासनाने नुकताच आदर्श उपविधी तयार केलेला असून यामध्ये २.५ टक्केपेक्षा जास्त कमिशन देण्यात येऊ नये, असे सूचित केले आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात जीआर काढून पुन्हा सूचित करण्यात आले आहे. या सर्व बाबींमुळे सर्व दैनंदिन बचत ठेव गोळा करण्याऱ्या प्रतिनिधींमध्ये असंतोषाची लाट उसळली असून अशा प्रतिनिधींनी प्रसंगी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचाही निर्देश दिलेला आहे.
राज्यात जवळपास एक लाखापेक्षा जास्त संख्येने दैनंदिन बचत ठेव गोळा करणारे एजंट उन्हातान्हात, पावसात, अहोरात्र फिरून अशा ठेवी गोळा करत आहेत. त्यांचे हे काम अतिशय त्रासदायक आहे. कमिशनवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक एजंटांनी घर, गाडी, शिक्षण यासाठी कर्जेसुद्धा घेतलेली आहे. त्यांचे हफ्ते या कमिशनमधूनच फेडण्याचे काम करत आहेत. अचानकपणे त्यांचे कमिशन कमी झाले तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
हा विषय राज्य पातळीवरचा असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गांभीर्याने चर्चेला जात आहे. फेडरेशनच्यावतीने राज्य फेडरेशनकडे या विषयांचे गांभीर्य विषद करण्यात आले आहे. अनेक जिल्हा फेडरेशन पिग्मी एजंटांना योग्य कमिशन मिळावे,यासाठी प्रयत्नशील आहेत,अशी माहिती राऊळ यांनी दिली.
जिल्ह्यात आंबोली येथे २३ मे व २४ मे रोजी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे अधिवेशन होणार आहे.या अधिवेशनासाठी पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे,दीपक केसरकर यांना निमंत्रित करण्यात आले असून शासनस्तरावर सहकारमंत्र्यांकडे हा विषय मांडून तो सोडविण्याचा प्रयत्न पतसंस्था फेडरेशन करणार आहे,अशी माहिती राऊळ यांनी दिली.
