जिल्ह्याच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा; नव्या प्रकल्पांना गती देण्यावर भर
सावंतवाडी :
भारतीय जनता पक्षाचे नव्याने निवडून आलेले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केसरी येथे सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामत यांची ही पहिलीच औपचारिक भेट ठरली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणारे नवे प्रकल्प, ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या जिल्हा दौऱ्यावर असून, त्याच पार्श्वभूमीवर ही भेट पार पडली. नव्याने जबाबदारी स्वीकारलेल्या अध्यक्षांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गदर्शन घेतल्याने आगामी काळात जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
