*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा गझल प्राविण्य, गझल मंथनच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांनी संजय कुळये यांच्या गझलेचे केलेले रसग्रहण*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गझलकार मा. श्री. संजय बाळकृष्ण कुळये हे पदवीधर शिक्षक असून जि. प. पू. प्रा. शाळा कोंडतिवरे, ता. राजापूर रत्नागिरी इथे कार्यरत आहेत.
ते विद्यार्थ्याच्यां ज्ञानार्जनात अलौकिक कामगिरी करत आहेत. सलग 9 वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे 100% निकाल आणलेत व त्यात दोन विद्यार्थांनी मेरीट मध्ये क्रमांक प्राप्त केले आहेत. तसेच त्यांनी शिक्षक प्रशिक्षणामध्ये तज्ञ् मार्गदर्शक म्हणून अनेकदा काम केले आहे. हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःचे वाचन व लेखनाचे छंद ही जोपासले आहेत.
ते एक उत्तम गझलकार असून अनेक शालेय व साहित्यिक स्पर्धांचे त्यांनी परीक्षणेही केली आहेत.
सामाजिक क्षेत्रातल्या बऱ्याच संघटनांशी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून जोडलेले आहेत. त्याच प्रमाणे साहित्यिक क्षेत्रात ही कार्याध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, उपविभाग प्रमुख इत्यादी नात्यांनी गझल समुहांशी ते जोडलेले आहेत.
त्यांचे दोन काव्य संग्रह ‘सागरलाटा’ व ‘मी मुक्त प्रवासी’ असे प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी ‘काव्यांकूर’ ह्या हरचिरी नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवितांच्या संग्रहाचे संपादन व स्वखर्चाने प्रकाशन केले आहे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.
सरांनी अ.भा.म.सा.संमेलनात गझल कट्ट्यावर बऱ्याचवेळा गझलांचे सादरीकरण केले आहे. तसेच “फुलोरा – कलेचे माहेरघर” या साहित्यिक संस्थेच्या माथेरानमधल्या 13 व्या संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
सरांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित केलेले आहे.
आता सरांची गझल आपण प्रथम वाचुया.
*गझल:-
तीच होती माणसे उन्माद होता वेगळा
त्याच होत्या दंगली पण वाद होता वेगळा
थेंब घामाचे जरासे भाकरीवर सांडले
मग सुक्या तुकड्यासही त्या स्वाद होता वेगळा
जन्म घेई भक्त तेव्हा राक्षसाच्याही घरी
काळही तो वेगळा प्रल्हाद होता वेगळा
डाव माझा संपवाया पंच होते ठाकले
धावचित मजला दिले पण बाद होता वेगळा
झेलले आरोप अन स्वप्नातला उच्छादही
जीवघेणा तो तिचा छळवाद होता वेगळा
या इथे गेलो जरी फासावरी मी कैकदा
काल झाला त्रास… तो जल्लाद होता वेगळा
वेगळ्या दुनियेतले राजेच आम्ही आमचे
एक गझलेचाच आम्हा नाद होता वेगळा
*- ©®संजय कुळये*
“होता वेगळा”अशी रदीफ सरांनी घेतली आहे त्यावरूनच हे लक्षात येते की भूतकाळ व वर्तमानकाळ ह्यावर शेर लिहिले आहेत. मागे घडलेल्या नि आता जे वास्तवात घडत आहे जरी सारखेच वाटत असले तरी दोन्ही कार्यात जमीन अस्मानाचा फरक आढळून येतो हे स्पष्ट करणारी ही गझल आहे.
सरांचा मतलाच बघा:-
*तीच होती माणसे उन्माद होता वेगळा*
*त्याच होत्या दंगली पण वाद होता वेगळा*
ब्रिटिश जेव्हा आपल्या देशावर राज्य करत होते. तेव्हा सर्व सामान्य माणसांच्या मनानं एकच भावना होती ती म्हणजे देश स्वतंत्र झाला पाहिजे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या मनात एकच उन्माद होता तो म्हणजे ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलून लावण्याचे. त्याकाळी क्रांतिकारी, पुरूष, स्त्रिया व मुलें सुद्धा एकाच धोरणावर विचार करून आंदोलने व मोर्चे काढून प्रतिकार करत होते. पण आज सध्याच्या आपल्या जगात माणसे आंदोलने, दंगली, मोर्चे काढून जो उपद्व्याप करून
सामान्य जनतेला नाहक त्रास देत आहेत.
आज आपण स्वतंत्र झालो आहोत. तरी लोकशाहीमध्ये लोकांचे वेगवेगळ्या वादावरून भांडण तंटे व विवाद होऊन जनजीवन विस्कळीत होत आहे.
त्याकाळी एकजुटीने प्रतिस्पर्धी, म्हणजेच ब्रिटिशांबरोबर, वाद विवादामुळे दंगली व्हायच्या. पण आता होत असलेल्या आपसातल्या दंगली असल्याने कोणास दोष द्यावा गझलकारास काही कळत नाही असेच म्हणायचे असेल.
दुसरा द्विपदी बघुया:-
*थेंब घामाचे जरासे भाकरीवर सांडले*
*मग सुक्या तुकड्यासही त्या स्वाद होता वेगळा*
या शेरांत श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. घाम गाळून स्वतःच्या कष्टाच्या भाकरीची किती अमुल्य किंमत असते हे सांगितले आहे.
श्रीमंतीच्या जगात वावरणाऱ्या लोकांस साध्या भाकरीची किंमत कळणारच नाही.
ऐश आरामात जगणाऱ्यांना भूक म्हणजे काय हे कळत नसावे. अन्नाची नासाडी करून कचऱ्यात टाकणाऱ्या लोकांस कष्ट नि घाम गाळण्याचे माहीतच नसेल! दिवसभर राबून घाम गाळणारा कामकरी जेव्हा सुकी भाकरी खायला बसतो. तेव्हा त्याच्या कपाळावरचा घामाचा थेंब ही त्याला चटणी समान होऊन ती भाकरी रुचकर लागते.
अमाप कष्ट करून सुद्धा पोटभर खायला मिळत नाही आणि कधी भाकरी मिळाली तर त्या भाकरीच्या तुकड्यावर पडलेला घाम सुद्धा त्या बिचाऱ्या मजुरास अमृताची चवी देऊन जातो!
किती कारुण्यमय हे चित्र! गझलकारने इथे कष्ट उपसणाऱ्या मजुरांच्या दयनीय परिस्थितीचे वर्णन सुखी भाकरी, घाम व चव अशी प्रतिके घेऊन केले आहे.
आता तिसरा द्विपदी:-
*जन्म घेई भक्त तेव्हा राक्षसाच्याही घरी*
*काळही तो वेगळा प्रल्हाद होता वेगळा*
देव व दानव ह्या़ंची प्रतिके घेऊन केलेला हा शेर पहा:-
मानवाचा जन्म कुठे व्हावा हे सर्व परमेश्वराने ठरवलेले असते. त्याकाळी नि आताही. घरातल्या संस्काराचे मुलांवर परिणाम होतात असे म्हटले जाते. पण ह्याला अपवाद भक्त प्रल्हाद होता. त्याचा बाप एक राक्षस, अत्यंत अंहकारी होता आणि त्याचाच मुलगा भगवान श्री विष्णूचा परम भक्त होता. भक्त प्रल्हाद “नारायण नारायण” नामाचा सतत जप करत होता आणि त्याकरता हिरण्यकश्यपू ने त्याचा खूप वेगवेगळ्या तर्हेने छळ केला नि भगवानाच्या कृपेचे वरदहस्त असल्याने प्रल्हादला काही झाले नाही. शेवटी विष्णू ने स्तंभातून नरसिंह अवताराचे रूप घेऊन राक्षसाचा वध केला.
दशावतारांपैकी हा एक विष्णूचा अवतार मानला जातो. पूर्वी दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी
श्री भगवान विष्णूंनी दहा म्हणजे दशावतार घेऊन दुष्टांचा संहार केला.
आता कलियुग, चार युगांपैकी (सत्य, त्रेता, द्वापर, कली) म्हणजे चौथे युग सुरू आणि शेवटचे युग आहे. आता राक्षस नाहीत पण दानव रुपी मानव आहेत आणि त्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू अवतार घेत नाहीत. तो काळ वेगळा होता नि आजचा काळ वेगळा असे गझलकार म्हणतात.
चौथा द्विपदी:-
*डाव माझा संपवाया पंच होते ठाकले*
*धावचित मजला दिले पण बाद होता वेगळा*
सरांचा हा शेर सध्याच्या वास्तवावर आधारित आहे. आजच्या जगात भष्टाचार प्रमाणाबाहेर वाढलाय. जळी स्थळी भष्टाचार मातलेला आहे.
जर एखादा खेळाडू छान खेळून स्पर्धेत पुढे जात असेल तर त्याचे पाय कसे खेचायचे याची तजवीज अगोदरच केलेली असते.
पंच लोकांना पैसे देऊन खोटा निकाल देण्यास प्रवृत्त करायचे. क्रिकेट खेळांमध्ये तर हे सर्रासपणे चालवले जाते. कुणाला बाद करायचे हे अगोदरच ठरलेले असायचे. जरी बाद झालेला खेळाडू त्यांचा असला तरी धावचित गझलकारास केले जाते. खऱ्या खेळाला किंमत नसून पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय दिले जातात आणि हे फक्त खेळाच्या बाबतीतच नव्हे तर सगळीकडे आहे. ह्याची गझलकारास अतिशय खंत वाटते आणि यावर उपाय सुचत नसल्याने तो हतबल होतो असेच गझलकार या शेरात सांगत असावे.
पाचवा द्विपदी:-
*झेलले आरोप अन स्वप्नातला उच्छादही*
*जीवघेणा तो तिचा छळवाद होता वेगळा*
हा शेर सुद्धा वास्तविकतेवर भाष्य करणारा आहे.
लग्न हे दोन घराण्याच्या संबंधाने जोडलेले मंगल कार्य असते.
गरिबातला गरीब सुद्धा आपआपल्या परीने लेकीची पाठवणी जमेल तेवढे देऊन करतोच. काहीजण मागून घेतात तर काही जण हौसेने देतात. एवढे असून सुद्धा मुलीला सासरी काही सुख समाधान मिळत नाही. ती बिचारी तेव्हा होती नि आजही एवढी शिकलेली असली तरी चूपचाप सहन करते. प्रतिष्ठेला डाग लागू नये म्हणून जपत असते.
श्रीमंताच्या घरी अफाट हुंडा घेऊन सुद्धा सुनेला त्रासापासून सुटका नसते. प्रेम विवाह केलेला असला तरी सुख क्वचित पोरींना मिळत असेल. आईबापाला त्रास नको म्हणून ती बापुडी लेक सासरी मुकाट सगळे सहन करत असते. तिचा जीव घेण्या पर्यंत छळवाद होत असतो. तिच्यावर वेगवेगळे आरोप लावले जातात आणि ते सगळे सहन न झाल्याने ती पोर आत्महत्या करते अथवा तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. कधी कधी सासरचेच स्वतः मारून आत्महत्येचा कलंक लावतात. पूर्वी अडाणी अशिक्षित समाज होता, आता सुशिक्षित असून व मुली स्वतःच्या पायावर उभ्या असून सुद्धा सासरच्या छळाला वैतागून जीवन संपवतात. अशा वास्तवावर प्रकाश झोत टाकणारा सरांचा हा शेर आहे.
सहावा द्विपदी:-
*या इथे गेलो जरी फासावरी मी कैकदा*
*काल झाला त्रास… तो जल्लाद होता वेगळा*
गुन्हा केलेला असूदे अथवा नसूदे तक्रार नोंदवली की त्याची चौकशी होतच असते
जर काही धागे दोरे सापडले तर न्यायनिवाड्यासाठी आरोपी समजले त्यास न्यायालयात नेले जाते. अपराध सिद्ध झाल्यावर शिक्षा ठोठावली जाते. गझलकाराच्या बाबतीत असे बरेच वेळा झालेले असावे. तेव्हा उगीच कुणी त्यांना दोषी ठरवले होते. ते ठरवणारे सुद्धा परके होते त्यामुळे कैकदा फासावर जायची वेळ येऊन सुद्धा गझलकारास एवढे वाईट वाटले नव्हते. पण काल गझलकारास खूप त्रास झाला व खूप वाईटही वाटले कारण कालचा जल्लाद कुणी परका नसून त्यांच्या घरचाच अगदी विश्वासातलाच होता. परक्या माणसाने दोष दिला तर मनाला एवढे काही वाटत नाही पण आपल्या विश्वासातल्या माणसानेच आपल्यावर संशय घेऊन फासी देतो ही अतिशय केल्शदायक गोष्ट झाल्याने गझलकारास अतिशय मनस्ताप झाला आहे.
न्यायालयात वकिलांची वकिली सुद्धा खऱ्याचे खोटे करण्यास व खोट्याचे खरे करण्यास तत्पर असते. जो वकील खऱ्याचे खोटे करून जिंकतो तोच प्रख्यात वकील म्हणून नावाजला जातो.
“चोर सोडून संन्याशाला शिक्षा” ही म्हण उगीच लागू नाही पडली. न्यायालयात अशाच प्रकारच्या गोष्टी घडत असतात आणि निर्दोष असलेल्यास शिक्षा भोगावी लागते असेच गझलकार ह्या शेरात म्हणत असावे.
शेवटचा शेर :-
*वेगळ्या दुनियेतले राजेच आम्ही आमचे*
*एक गझलेचाच आम्हा नाद होता वेगळा*
हा सरांचा शेवटचा शेर स्वतःवरच लिहिलेला असावा असे वाटते.
राजा म्हटला की राजाला हवे तसे कायदे नि हवा तसा राजकारभार चालवता येतो. सध्या आपल्या देशात लोकशाही असली तरी गझलकार स्वतःला वेगळ्या दुनियेतले राजे समजतात. आम्हीच आमचे राजे. म्हणजे इथे गझलकारावर कुणाचेच बंधन नाही आणि ह्याला कारणही तेवढेच आहे. ते म्हणजे गझलकार गझलेच्या प्रेमात पडलेले आहेत.
गझलेच्या प्रेमात पडलेला माणून स्वतःचा नसतोच. दिवस रात्र त्याच्या ध्यानी मनी सतत गझलच असते. त्या गझलेच्या प्रेमाने त्याला ठार वेडा केलेला असतो. “हा नाद खुळा” असे म्हटल्याप्रमाणे गझलकार गझल लेखनात एवढा व्यग्र असतो, त्यास गझलेचेच वेड लागलेले असते. मनाला हवे तसे हवे तेव्हा गझल लेखन करण्यास आमच्या सारखे आम्हीच राजे असे गझलकार सांगू इच्छितात असे वाटते.
‘राजा’ नि ‘नाद’ सरांनी छान प्रतिके घेतलेली आहेत.
*या गझलेची रदीफ:- ‘होता वेगळा’ ही आहे.*
*उन्माद, वाद, स्वाद, प्रल्हाद, बाद, छळवाद,*
*जल्लाद आणि नाद असे सरांनी कवाफी घेतलेले आहेत.*
धन्यवाद🙏
शोभा वागळे.
पुणे.
