कसब २०२६ : सावंतवाडीत दोन दिवसीय वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन
विद्यार्थ्यांची कलाकृती सादर होणार; अक्षरलेखन कार्यशाळा व Fine Art CET मार्गदर्शनाचा समावेश
सावंतवाडी :
डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे चालविण्यात येणाऱ्या Foundation Course in Art (One Year) या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे वार्षिक कला प्रदर्शन “कसब २०२६” (तिसरे वर्ष) दिनांक २० व २१ मार्च २०२६ या कालावधीत बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक २० मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी डॉ. सुनील लाड यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच दिनांक २१ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. सिद्धेश नेरुरकर यांची “अक्षरलेखन” या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी इयत्ता दुसरीच्या पुढील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
याच दिवशी १२ वी नंतरच्या व्यावसायिक Fine Art अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या डिग्री कोर्सची माहिती तसेच CET संदर्भात मार्गदर्शन प्रा. तुकाराम मोरजकर व प्रा. सिद्धेश नेरुरकर यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.
दरम्यान, संस्थेत गेल्या तीन वर्षांपासून हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या सुरू असून मागील दोन वर्षांत सुमारे ४४ विद्यार्थ्यांनी CET मध्ये यश मिळवून डिग्री कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे.
या कला प्रदर्शनास व कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. गोविंद (उर्फ केदार) बांदेकर आणि सचिव अॅड. अनुराधा बांदेकर-परब यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट (अप्लाइड आर्ट), सावंतवाडी येथे पार पडणार आहे.

