कुडाळमध्ये ‘राणे समर्थक प्रतिष्ठान’ची स्थापना; सामाजिक उपक्रमांना नवी दिशा
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा पुढाकार; लवकरच सदस्य नोंदणी मोहीम
कुडाळ
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील समर्थक व कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘राणे समर्थक प्रतिष्ठान’ची स्थापना केली आहे. या नव्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या प्रतिष्ठानमध्ये शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम यांच्यासह चेतन पडते, आनंद अणावकर आणि प्रथमेश केळबाईकर यांचा समावेश आहे.
सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या अडीअडचणींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे व्यासपीठ कार्यरत राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी सांगितले की, लवकरच प्रतिष्ठानची अधिकृत सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे युवक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
