*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*खिडकीतून…*
खिडकीतून दिसत होतं निळं आकाश नि त्याची
गहराई, विस्तिर्णता, ते अनंत असल्याची जाणीव
तरीही क्षितिजाला टेकल्याचा आभास,निळ्या खोल खोल डोहात बुडाल्याचा भास,क्षितिजकडेला रंगांची रांगोळी खास..
मानवाचा अंतराळी निळाईत उडण्याचा अदम्य
ध्यास,त्याच्या प्रबळ इच्छाशक्तिपुढे उडून जातात सारे त्रास, त्याला वाटते अंतराळातच
बांधावे सुंदरसे घरटे खास म्हणजे घेता येईल
भरभरून मोकळा श्वास..
कारण ह्या निळ्या निळाईत आता गुदमरतात
फुलपांखरे,पूर्ण सृष्टीलाच बसलाय आता प्रदूषणाचा फास, घेता येत नाही मोकळा श्वास,
क्वचितच दिसते आता फुलपांखरू उडतांना,
निळाईत ते बुडतांना, झोके घेतांना, आनंदात गिरक्या मारतांना,कारण फुलेही झालीत आता प्रदूषित,मकरंद आटलाय त्यांचा..
खिडकीतून दिसत होते मला समोरचे जग, निळी टेकडी, त्यावरची हिर्वीकंच झाडे,पण पांखरे
झालीत हो परागंदा, ना चिवचिवाट ना कलकलाट.. सारे कसे स्तब्ध शांत झाले आहे,
कुठल्या देशात गेलीत बिचारी? तिथे तरी असेल
का निळे तळे नि प्रदुषणमुक्त फळे.. ना साळुंख्या आहेत ना चिमण्या, मध्येच एखादा
कावळा करकरतो नि वाटते चला.. निदान कावळे तरी आहेत, हे ही नसे थोडके..
झाडेच राहिली नाहित तर ते कसे थांबतील हो?
निळ्या आभाळात धनुष्याकृती उडणाऱ्या,म्होरक्याच्या मागे मैलोन्मैल उडणाऱ्या
बलाकमालाही आता दिसत नाहीत. बगळ्या बगळ्या कवडी दे म्हणत आम्ही त्यांच्यामागे धावत असू हे तरी आताच्या मुलांना माहित आहे
काय? आणि मग बोटांच्या नखांवर कवडी दिसताच काय आनंद व्हायचा मला! माझ्या दारा
पुढच्या आंब्यावर, चिकूवर भारद्वाज, बुलबुल, शिंपी यायचे ते ही आताशा दिसत नाहीत. शिंपी
पानांचे घरटे बनवत नाही, इतका घाबरतो. क्वचितच चिकूवर दिसतो आता, एकटाच!
निळाई शोधायला कुण्या गावाला गेले असतील
बरं.. अहो, साळुंक्यांच्या आकाराची पक्ष्यांची
झुंडच्या झुंड समोरच्या टेकडीवर कलकलाट करत निळ्या नभात झेपावतांना बघायला किती
आनंद वाटायचा पूर्वी..
हे सारं खिडकीत बसत लिहितांना मी रोजच बघत
असे. झाडावर पक्ष्यांचा नाच बघतांना किती अप्रूप वाटायचे. हल्ली चिकूवर फक्त वटवाघळे
येतात व मनसोक्त चिकू खातात.सकाळी झाडाखाली बारीक बारीक चिकूचा चुरा व बिया
दिसतात. खा बाबांनो, खा.. तुमच्यासाठी मी चिकू
तोडतच नाही मुळी.
खिडकीतून दिसायची समोरंच मोठ्ठी टेकडी व
त्यावर वाढलेले मोठे मोठे वृक्ष. त्या वृक्षांवर चाललेला पक्ष्यांचा कलकलाट व त्यांचे मुक्त
हुंदडणे. डोळ्यांचे कसे पारणे फिटत असे बघतांना.पण त्या टेकडीलाच लागली दृष्ट नि
कोणे एके दिवशी बुलडोझरने सारी टेकडीच
उजाड होऊन बघता बघता वर्षभरातच एक इग्लिश स्कूल उभे राहिले व सुरुही झाले. “
कालाय तस्मै नम: “ म्हणत बघत रहायचे, बस्स!
आता ऐकू येतात माईकमधून कर्णकर्कश गाणी!
सिनेमाच्या गाण्याच्या तालावर झिंगणारी मुले.
व त्यांना प्रोत्साहन देत माईकमधून ओरडणारे
इंग्रजी शिक्षक. सारेच अद् भूत आहे हो.. कल्पनातीत..निळाई व हिरवाईकडून कॅांक्रिटकडे वाटचाल करणारे प्रवासी आहोत
आपण आता. पुढे काय वाढून ठेवले आहे देवालाच माहित. सामोरे जायची तयारी मात्र
ठेवावीच लागेल कारण..
“ करावे तसे भरावे” हा जगाचा नियमच आहे.
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
