You are currently viewing निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करिता आरक्षित असलेल्या जागा अनारिक्षत करुन त्या भरण्यासाठीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने कुडाळ, वाभवे- वैभववाडी, कसई- दोडामार्ग आणि देवगड- जामसंडे या नगरपंचायतीची उपरोक्त जागांसाठीची निवडणुक दि. 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश सामान्‍य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकरी रविंद्र मठपती यांनी दिले.

            या आदेशात म्हटले आहे, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करिता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करुन त्या जागा भरण्यासाठीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीची उपरोक्त जागांसाठी निवडणुक दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

            लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग-2) मधील नियम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते. जे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे वरील वस्तुस्थिती पाहता खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत.

            1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

            2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील ( उदा. खासगी कंपनी यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्य गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपनी, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)

            3) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान  क्षेत्रातील कामगारंना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

            4)  वर नमुद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.

            सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात येत आहे. तसेच पूर्ण दिवस सुट्टी देणे आस्थापना मालकांना शक्य नसल्यास पूर्व परवानगी घेऊन दोन तासांची सवलत देण्यात यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =