You are currently viewing ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार! – बाबा भांड

ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार! – बाबा भांड

*ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार! – बाबा भांड*

*ग्रंथोत्सव २०२५चा समारोप*

पिंपरी

‘ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असते. त्यासाठी मुलांना बालपणापासून ग्रंथांच्या संगतीने वाढविले पाहिजे!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी काॅलनी येथे रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२५च्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बाबा भांड बोलत होते. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, पुणे प्रमुख कार्यवाह सोपान पवार, पुणे विभाग ग्रंथालय संघ कार्यवाह राजेंद्र ढमाले, कोषाध्यक्ष रमेश सुतार, आर्य समाज सचिव दिनेश यादव आणि पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल आणि कर्मचारीवर्ग यांची सभागृहात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

बाबा भांड पुढे म्हणाले की, ‘प्र. के. अत्रे यांच्या ‘मी कसा झालो?’ या पुस्तकाने शालेय वयातच मला लेखनाची ऊर्मी मिळाली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ग्रंथ चळवळीला उत्तेजन दिले; आणि त्यापासून प्रेरणा घेऊन मी प्रकाशक झालो!’ प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी, ‘आत्मा सुंदर करणारे पार्लर म्हणजे वाचनालय होय. त्यामुळे आजच्या गुगलपिढीला वाड्.मयाचे अधिष्ठान बहाल केले पाहिजे!’ असे आवाहन केले. रमेश सुतार यांनी, ‘अक्षरांचे कण अन् कण वेचीत मानवी जीवन सत्कारणी लावावे!’ असे विचार मांडले; तर सोपान पवार यांनी ग्रंथोत्सव २०२५मध्ये पंचवीस वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांना सन्मानित करण्यात आले, ही अतिशय स्तुत्य बाब आहे, असे नमूद केले. दिनेश यादव यांनी आर्य समाज पुस्तकालयाची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथपाल आणि वाचक यांना प्रशस्तिपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. श्रीकांत सांगेपाग, प्रमोद ढगे, सुदाम तारख, शरयू कर्डिले, संगीता पठारे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. पूजा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. श्रेया गोखले यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा