*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकारा मेघा कुलकर्णी मेघनुश्री लिखित अप्रतिम लेख*
*गरज आणि निर्मळता*
पाणी ! पाणी !! गरज आणि निर्मळता, उन्हाळा सुरू होताच जिथे जलाचे दर्शन तिथे शांतता. जीवनाच्या श्वासाइतकीच प्रत्येक थेंबाची गरज. तहानलेल्याला पाणी देणे ही तर भारतीय संस्कृतीतील उच्चपरंपरा पण आजची परिस्थिती आणि वास्तव मात्र वेगळेच आहे. काही पिढ्यांआधी विस्तीर्ण जलाशय व नद्यांमधील वाहते पाणी हे मनसोक्त अनुभवणारे आपले पूर्वज, ज्यांनी दैवत मानले पंचमहाभूतांना. पिढी बदलली नदीतले पाणी झरे-ओहोळ या स्वरूपांत दर्शन देऊ लागले. त्यानंतरचा काळ म्हणजे घरोघरी नळांतून येणारे पाणी, सहज उपलब्ध होणारे पाणी आता डिसेंबर-जानेवारीत आटू लागले. हे सर्व पहाताना, अनुभवताना किमानतेची जाणीव नकळत त्रासदायक ठरते. भौगोलिक परिस्थितीचा विस्तार आणि दैनंदिन मिळणारे पाणी याची सांगड घालणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. सोसायट्या व त्यांतील राहणीमान विचारांत घेता काही वेळा मूठभर लोकांच्या आडमुठेपणामुळे इतरांना त्रास भोगावा लागतो. सतत दुसऱ्यांचा अवमान करण्यांत धन्यता मानायची, वेळेवर रक्कम / पैसे जमा न करण्याची वृत्ती असते. मग घरांघरांतील लहान पिल्ले ही टँकरची वाट टकामका पहात असतात.
समजून घेण्याची वृत्ती असेल तरच एखादा सद्विचार व त्या विषयावरील संभाषण पुढे नेण्यांत शहाणपण असते. सभेत अनेक जण उपस्थित असतात, त्यांचेही मत असू शकते. फक्त आरडाओरड आणि गोंधळ यांतून मग काहीच निष्पन्न होत नाही. साधी अपेक्षित उपस्थिती रहात नाही. सहकार्याविना काही गरजांची, समस्यांची पूर्तता होऊ शकत नाही हे माहीत असूनही अशा आविर्भावात आणि टेचांत काहींचा वावर असतो. काही लोक असेही विचार करतात की मोठ्या व्यक्तींच्या वर्तणुकीतून पुढच्या पिढीसमोर एकतेची भावना व तो आदर्श कसा राहील याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे जरी सत्य असले तरी माणूस म्हणून विचार करता आला पाहिजे. समाज आहे कशासाठी ? एकत्रित येऊन संघटीत होऊन चांगली कामे पुढे नेण्यासाठी, त्याचबरोबर वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, ‘मी म्हणेल तीच पूर्वदिशा’ हे तत्व सामाजिक बांधिलकीस लागू होत नाही. कळपाने राहण्याची गरज मनुष्यप्राण्यालाही आहे हे विसरून चालणार नाही. जेथे एकविचारांचे मताधैक्य असते, तेथेच यशप्राप्ती होते.
समस्यांचे निराकारण करण्यासाठी मुद्देसूद मांडणी आणि जी तैलबुद्धीची आवश्यकता असते, ती काही लोकांकडेच असते याचाही विचार करून अधिक चांगल्या प्रकारे कामे पुढे जाऊ शकतात. अनेक क्षेत्रांशी निगडीत उच्चपदस्थ व्यक्ती आजूबाजूस असतात. वाढत्या आयुर्मानाची ही समृध्द मांदियाळी असते. अनुभवाचा नक्कीच फायदा होतो. हे सर्व बाजूला सारून पुढे पुढे करणाऱ्यांचा शेवटी तोटाच होतो. ज्या काय दोन-चार व्यक्ती आधीपासून सोबत असतात त्याही निघून जातात. पुढे दहा-पंधरा वर्षांनी संस्था, मंडळ, सोसायटी यांना कुणाच्याही पुढारीपणाची गरज नसते, मग संवाद साधणे सुद्धा कठीण होऊन जाते.
अंदाधुंदी माजवून विखारी विचार पसरवणे खूप सोपे असते, पण दुसरी बाजू ही सुद्धा आहे की, चांगल्या कर्माची नोंद कुठेतरी होत असते. असे म्हणतात की, “परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो परंतु ज्यावेळी तिचा फटका बसतो त्यावेळी मनुष्य आयुष्यातून उठतो.” आजमितीला एखाद्या माणसाने अरेरावी करत सगळ्यांना शांत बसवले तरी, तेच पुढे काही वर्षांनी त्याचे प्रारब्ध बनून उभे ठाकते याची जाणीव ठेवून तरी वागणे असले पाहिजे. आजचा उद्दामपणा भविष्यातील एकटेपणा हे निर्विवाद सत्य आहे. सुंदर विश्व आपलेसे करून घेण्यासाठी जवळपासच्या परिसरांतील स्थानिक लोकांशी जुळवून घेता आले पाहिजे. जसा गाण्याचा योग्य सूर स्वरांचा विलोभनीय संगम तयार करतो, तसेच वेळोवेळी जाणलेली किंवा ठेवलेली शब्दांची किंमत बरीच मदत करून जाते, गरजेतही निर्मळता टिकवता आली पाहिजे.
© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
मोबाईल : ७३८७७८७५१२
