You are currently viewing अंबादेवी संस्थानतर्फे होणाऱ्या सत्कारनिमित्त 

अंबादेवी संस्थानतर्फे होणाऱ्या सत्कारनिमित्त 

 पद्मश्री बोथेदादा

 

अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्री अंबादेवी संस्थानतर्फे केंद्र शासनाने पद्मश्री जाहीर केल्याबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन बोथे यांचा गुरुवार दि. 13 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानच्या कीर्तन सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. 26 जानेवारीला जाहीर झालेल्या पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण या शृंखलेमध्ये श्री जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री जाहीर झाली होती. आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील अमरावती नागपूर रोडवरील गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व आश्रम संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या आश्रमाला भेट देण्यासाठी चार राष्ट्रपती सहा पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री महात्मा गांधी विनोबा भावे अण्णा हजारे त्यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व येऊन गेलेले आहे.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणजे गुरुकुंज मोझरी. आज महाराष्ट्रातच नव्हे तर इतरत्र पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता सर्व दूर पसरलेली आहे. राष्ट्रसंतानंतर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा सरचिटणीस म्हणून श्री जनार्दनपंत बोथे यांनी उत्कृष्ट काम केले आहे व करीत आहेत. सामाजिक बांधिलकीचा हा माणूस अतिशय विनयशील वक्तशीर व कर्तव्यदक्ष आहे. त्यांच्याच या गुणांची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्रीसाठी पात्र ठरवले आहे.

श्री अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा व्याप फार मोठा आहे. शिक्षण संस्था आहेत. आयुर्वेद महाविद्यालय आहे. वससतीगृहं आहेत. शाळा आहेत. आश्रम आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या 25000 शाखा विखुरलेल्या आहेत. या सर्वांचे व्यवस्थापन करणे म्हणजे इंद्रधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. पण बोथेदादांनी समर्पित भावनेने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाला अहो रात्र वाहून घेतले आहे.

आपण आश्रमामध्ये बोथे दादांकडे आलो म्हणजे त्याची प्रचिती येते .त्यांचे बोलणे वागणे विनयशीलता आदर्श सर्वच काही नमूद करण्यासारखे आहेत. गुरुदेव सेवा मंडळाची सकाळचे ध्यान व सायंकाळची प्रार्थना जर आपण केली तर जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते. इतके सामर्थ्य त्या प्रार्थनेमध्ये आहे.

बोथेदादा कमी बोलतात. पण काम जास्त करतात. कार्यकर्त्यांना किंवा विद्यार्थ्यांना ते फक्त इशारे करतात. कधी डोळे वापरतात. तर कधी हात वापरतात. तर कधी बोटे. पण समोरचा माणूस त्यांना काय म्हणायचे आहे ते समजून जातो. मौनात खरोखर जग जगते असे म्हणतात ते काही खोटे नाही. आमचे अनेक कार्यक्रम श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या भव्य अशा स्मृती मंदिरात होतात. अंकुर साहित्य संमेलन असो की विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन असो की आमच्या मिशन आयएएस या संस्थेचे वार्षिक शिबीर दअसो या सर्वांसाठी बोथेदादांनी गुरुदेव सेवा मंडळाची दारे आमच्यासाठी मोकळी ठेवलेली आहेत. कार्यक्रमाच्या दरम्यान ते स्वतः सर्व गोष्टींवर जातीने लक्ष देऊन असतात. आमच्या कार्यक्रमांमध्ये काहीही कमतरता भासू देत नाहीत.

 

मौन श्रद्धांजलीमुळे मौन श्रद्धांजली मुळे गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ हे जास्त लोकाभिमुख झाले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मौन श्रद्धांजली म्हणजे हा ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदण्यासारख्या कार्यक्रम आहे. त्याची तयारी तीन महिन्यापासून सुरू असते. लाखो लोक काही वेळासाठी मौन यधारण करू शकतात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही .पण ते गुरुकुंज मोझरीला ते शक्य झाले आहे.

दादांनी आता वयाची 86 वर्षे पूर्ण केली आहेत. पण याही वयामध्ये ते नियमितपणे संस्थेचे कामकाज नीटपणे सांभाळत आहेत.येणाऱ्या प्रत्येकाशी वार्तालाप करीत आहेत. त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत दआहेत आणि म्हणूनच गुरुकुंज मोझरीला आलेला व बोथे दादांना भेटलेला प्रत्येक माणूस त्यांना विसरणे शक्य नाही.

बोथेदादा लहान असताना म्हणजे साधारण दहा वर्षाचे असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आग्रहाने त्यांच्या आई-वडिलांना तुमच्या मुलाला म्हणजे जनार्दनला माझ्या हवाली करा . त्याच्या आयुष्याचे भले करीन असे सांगितले आणि णत्या मायमाऊलीने जनार्दनला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या झोळीत घातले आणि बोथेदादांच्या जीवनाचे सार्थक झाले.

 

राष्ट्रसंतांच्या विचारावर तंतोतंत चालणे हे कठीण काम आहे .ते यासाठी की गुरुकुंज मोझरी येथे कोणताही पूजा पाठ नाही. कोणतीही मूर्ती नाही. अंधश्रद्धा नाही . अवडंबर नाही .खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या नात्याने इथले काम चालते. ही तारेवरची कसरतच आहे. पण बोथे दादा ही कसरत करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत .म्हणूनच त्यांच्या पदरी पद्मश्रीसाठी सारखी अतिशय मानाची पदवी केंद्र सरकारने त्यांना प्रदान केली आहे. पद्मश्री जाहीर झाल्यानंतर त्यांचे ठीक ठिकाणी सत्कार होत आहेत. अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानने या कामी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानावे तेवढे कमीच आहेत. दिनांक 13 मार्चला सायंकाळी पाच वाजता अंबादेवी मंदिराच्या परिसरात असलेल्या कीर्तन सभागृहातील बोथेदादांच्या सत्कार समारंभासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा