You are currently viewing प्लास्टिकमुक्त ‘नरेंद्र डोंगर’ संकल्पनेची सुरुवात; सिंधुदुर्गात ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
Oplus_16908288

प्लास्टिकमुक्त ‘नरेंद्र डोंगर’ संकल्पनेची सुरुवात; सिंधुदुर्गात ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाचा पुढाकार; उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची घोषणा, स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

सावंतवाडी :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वनविभागाने ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही संकल्पना राबविण्याची घोषणा केली. नरेंद्र डोंगर येथे आयोजित स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सहसचिव विनायक गावस, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार रुपेश हिराप, नागेश पाटील, भुवन नाईक, श्रीरंग सावंत, तनय रेडकर, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल मिताली कुबल, प्रमोद राणे यांच्यासह वनरक्षक आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

मिलीश शर्मा म्हणाले की, दरवर्षी सिंधुदुर्ग वनविभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यंदा नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारी पर्यावरणीय हानी लक्षात घेऊन ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही संकल्पना अमलात आणण्यात आली आहे. त्याची सुरुवात पर्यावरण दिनी करण्यात आली. यासोबतच वृक्षारोपणही करण्यात आले.

संपूर्ण जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये प्रामुख्याने दीड हजार वडाची झाडे तसेच औषधी गुणधर्म असलेल्या साडेतीन हजार नरक्या वृक्षांचा समावेश आहे. गतवर्षी लावलेल्या सुरंगी वृक्षांचीही जोपासना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वनविभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनपर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. पारपोली, नरेंद्र डोंगर आणि आंबोली येथे होमस्टे सुविधा उपलब्ध असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आंबोली वर्ष पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र डोंगर येथे ‘वर्ष वन पर्यटन’ उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

दरम्यान, पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नरेंद्र डोंगरावरील खासगी वनक्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत चिंता व्यक्त केली. वृक्षारोपणाबरोबरच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी नागरिक व निसर्गप्रेमींना वनविभागासोबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “ही झाडे आपली आजी-आजोबा आहेत, असे समजून त्यांचे जतन केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

या स्वच्छता मोहिमेत तब्बल ५० गोणी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा