You are currently viewing पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवरील ‘कोरडी हळद’मधून डॉ. कनिष्का पाटील यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
Oplus_16908288

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवरील ‘कोरडी हळद’मधून डॉ. कनिष्का पाटील यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबईतील डॉ. कनिष्का पाटील लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहेत. २०२७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘कोरडी हळद’ या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटात त्या मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहेत. ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईचे वास्तव, मानवी संघर्ष आणि पाण्याचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. वास्तववादी थ्रिलर शैलीतील या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन ही तिन्ही जबाबदाऱ्या चिनी चेतन सांभाळत आहेत. देवराज मुव्हीजच्या बॅनरखाली सुखदेव मिश्रीलाल जैसवार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माता म्हणून दत्तात्रय पाटील कार्यरत आहेत. चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात व्यापक ऑडिशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. त्या प्रक्रियेत डॉ. कनिष्का पाटील यांच्या अभिनयाने दिग्दर्शकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. साधेपणा आणि सहज अभिव्यक्तीमुळे त्यांची मुख्य नायिकेसाठी निवड करण्यात आली.

‘कोरडी हळद’ या चित्रपटाची कथा मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या ज्वलंत वास्तवावर आधारित आहे. ग्रामीण जीवनातील संघर्ष, सामाजिक वास्तव आणि पाण्याचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व यांचे प्रभावी चित्रण कथेतून उलगडणार आहे. समाजातील गंभीर प्रश्न अधोरेखित करतानाच पाण्याच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे. दिग्दर्शक चिनी चेतन यांच्या मते, डॉ. कनिष्का पाटील यांचा नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय चित्रपटाच्या भावनिक आशयाला अधिक प्रभावीपणे पोहोचवेल.

मुख्य भूमिकेसाठी डॉ. कनिष्का पाटील विशेष तयारी करत आहेत. ग्रामीण बोलीभाषेचे प्रशिक्षण त्या घेत आहेत. पात्राच्या भावविश्वाचा सखोल अभ्यास त्या करत आहेत. प्रत्येक दृश्याच्या गरजेनुसार अभिनय अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने सरावही सुरू आहे. पात्रातील भावनिक सत्यता जपण्यासाठी त्या मनापासून प्रयत्न करत असल्याचे चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आले.

चित्रपटाचे संगीत संदीप डांगे यांनी दिले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून नजीर सय्यद कार्यरत आहेत. लाईन प्रोड्युसर म्हणून विष्णू चौधरी जबाबदारी सांभाळत आहेत. स्थानिक निर्मिती प्रमुख म्हणून वाल्मिक गाडे पाटील आणि सुरेश जगताप कार्यरत आहेत. शिर्डी परिसरातील कलाकारांमध्ये विष्णू चौधरी, सचिन वाणी, रामनाथ कातोरे, प्रदीप फटांगरे, सचिन घेवराईकर आणि महेश लोखंडे यांचा समावेश आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मॅक मकवाना, सचिन कांबळे, शलाका पाटील आणि आबा कार्यरत आहेत. चित्रपटाच्या निर्मितीसाठी शिर्डीचे नगराध्यक्ष अभय भैय्या शेळके यांचे सहकार्य लाभले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा