साटेली-भेडशीचा सुपुत्र श्रेयस सावंत भारतीय सैन्यात लेफ्टनंट*
अवघ्या २३ व्या वर्षी मिळवले यश; साटेली-भेडशी व परमे गावात अभिमानाचे वातावरण*
*दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथे वास्तव्यास असलेले आणि मूळ परमे गावचे सुपुत्र श्रेयस सखाराम सावंत यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी मिळवलेले हे यश तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले असून साटेली-भेडशी तसेच परमे गावात त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रेयस सावंत यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साटेली-भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात त्यांनी पदवी शिक्षण घेतले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रेयस यांनी भारतीय सैन्य दलाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आणि त्यानंतर त्यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली.
श्रेयस सावंत यांचे वडील शेतकरी असून अत्यंत साध्या कुटुंबातून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे साटेली-भेडशी तसेच मूळ गाव परमे येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.गरिब कुटुंबातील मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
