शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न – उपसभापती गौरव मुळीक यांची ग्वाही
सावंतवाडी :
सभापती पदाच्या कार्यकाळात पंचायत समितीची मंजूर इमारत पूर्णत्वास आणण्याबरोबरच विविध विधायक कामे राबविणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी दिली. तर शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत उपसभापती गौरव मुळीक यांनी व्यक्त केले. सभापती-उपसभापती निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सभापती सुस्मिता जाधव म्हणाल्या, मला दिलेल्या संधीबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानते. सभापती पदाच्या कार्यकाळात जनहिताची कामे करण्यावर आपला भर राहील. तसेच प्रशासकीय स्तरावर मंजूर झालेली पंचायत समितीची इमारत माझा कार्यकाळ संपण्यापूर्वी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपसभापती गौरव मुळीक म्हणाले, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाने दिलेली संधी ही केवळ भाजपमध्येच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील चार महिन्यांत चांगला कारभार दिसून येईल तसेच पहिल्याच बैठकीत पंचायत समितीच्या इमारतीचा विषय मांडला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
