You are currently viewing महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा आणि सांगीतिक मैफल उत्साहात संपन्न

महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा आणि सांगीतिक मैफल उत्साहात संपन्न

*महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा आणि सांगीतिक मैफल उत्साहात संपन्न*

पिंपरी (दिनांक : ०९ मार्च २०२६)

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या पुनावळे आणि वाकड शाखांच्या वतीने दोन दिवसीय पुनेविला प्रीमियर लिग ३ या महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुनावळे येथे करण्यात आले होते. रविवार, दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी राॅयल शेरनीज या विजेत्या संघाला करंडक प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका रेश्मा भुजबळ यांनी, ‘महिला या जशा संगीतात नैपुण्य दाखवतात; तशा मैदानावर क्रिकेटही खेळू शकतात!’ असे गौरवोद्गार काढले. तर बक्षीस वितरण प्रसंगी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी, संचालिका अर्पिता कुलकर्णी आणि गायक अथर्व कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या संघासह सर्वांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अभय कुलकर्णी यांनी, ‘फक्त चूल आणि मूल ही ओळख पुसून टाकीत एकविसाव्या शतकातील महिलांनी आपण पुरुषांपेक्षाही जास्त क्षेत्रांत अग्रेसर आहोत हे सिद्ध केले आहे!’ असे मत व्यक्त केले; तर अर्पिता कुलकर्णी यांनी स्त्री शक्तिपीठांची माहिती देत त्यापासून सातत्याने महिलांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

पुनेविला प्रीमियर लिग ३ या स्पर्धेत झाँसी फायटर्स, दुर्गा वॉरियर्स, रॉयल शेरनीज, मराठा स्ट्राईकर्स या संघांनी सहभाग घेतला होता. त्यात अतिशय चुरशीच्या अंतिम लढतीत रॉयल शेरनीज संघाने दुर्गा वॉरियर्स या संघावर मात करून विजेतेपद पटकावले. मान्यवरांच्या हस्ते कर्णधार प्रियंका खताळे यांनी विजेतेपद स्वीकारले. तसेच श्रद्धा श्रीवास्तव, शीला जाधव, शुभांगिनी राई या अन्य संघांच्या कर्णधार आणि विशेष कामगिरी केलेल्या महिला खेळाडूंना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभाचा सुरेल समारोप गायक अथर्व कुलकर्णी यांनी गीत फुलोरा संचलित विशेष सांगीतिक मैफलीने केला. त्यामध्ये स्वरोपासनातील कृतिका शिरसाठ, कल्पा फडते, आरती धांडे, मीनल चव्हाण, ऋतुजा जाधव, चैतन्य शरण, भाग्यदा कुलकर्णी, श्लोक कुलकर्णी, प्रखर श्रीवास्तव, ओंकार कुलकर्णी, योगेंद्र लांजे यांनी गायनसाथ केली. श्रद्धा कांबळे आणि उमा शाह यांनी स्पर्धा संयोजनात सहकार्य केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा