You are currently viewing उत्सवाच्या रंगात रसिक जन दंगले

उत्सवाच्या रंगात रसिक जन दंगले

खुशबू बंगला प्रांगण, चिंचवड – (५ मार्च)

महिला दिनाचे आणि होळीचे औचित्य साधून कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने कवी संमेलन आणि “आठवणींचा गाव” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. साहित्य, गाणी, गोष्टी आणि मनमोकळ्या गप्पांच्या संगमातून रंगलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः उत्सवाच्या रंगात रंगवून टाकले.

कवी संमेलनात कवयित्री रश्मी कांकरिया, दत्तू ठोकळे,वैशाली गावंडे, शामराव सरकाळे, देवेंद्र गावंडे, माधुरी डिसूजा, शशिकला देवकर आणि राजश्री वाघमारे यांनी आपल्या सुंदर, भावस्पर्शी,विनोदी,मनाला भिडणाऱ्या काव्यरचना सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या काव्यसादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

तसेच “आठवणींचा गाव” ह्या रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन ने प्रस्तुत केलेल्या या कार्यक्रमात नरेंद्र आमले, साक्षी देवरे, सुनिता बोडस, प्रशांत कुलकर्णी आणि वनश्री कोल्हटकर यांनी कविता, नृत्य, गोष्टी आणि गप्पांच्या माध्यमातून स्त्रीचे भावविश्व हळुवार उलगडून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

याच कार्यक्रमात “ताईची वुशु” या चायनीज खेळाबद्दल राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट डॉ.जॅस्मिन पोकरणा यांनी माहिती देत त्यामागील संकल्पना आणि उद्देश उपस्थितांसमोर उलगडून सांगितला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा छायाताई कांकरिया यांनी चिंचवडचे आराध्य दैवत मोरया गोसावींवर केलेली रचना आणि अतिथी मनोगतात डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी कवितेवर केलेल्या

भाष्याला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. मीनाताई पोकरणा यांच्या खुशबु या वास्तुत हा सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मा.अनंत कोऱ्हाळे आणि मा.अपर्णा डोके आणि नवयुगचे राज अहेरराव हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आणि होळीच्या आनंददायी वातावरणात रंगलेला हा साहित्यिक, सांस्कृतिक सोहळा उपस्थितांच्या मनात आठवणींचे रंग भरून गेला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन कर्मयोगिनी संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा सीमा शिरीष गांधी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभय पोकरणा, नील गांधी, शांतीलाल गांधी यांनी संयोजनात सहकार्य केले. सलोनी गांधी यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा