*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा प्रा. सुनंदामाई पाटील यांच्या पाचवा कोपरा कथा संग्रहाचे काशिनाथ भारंबे “निर्मोही” यांनी केलेलं रसग्रहण*
*अखंड जगणं शिकवणारा “पाचवा कोपरा”*
*पाचवा कोपरा* ही शीर्षक स्थानी असलेली म्हणजेच पुस्तकाचे नांव असलेली कथा मला जालना येथील माझे मित्र सुनील लोणकर यांनी व्हाट्सअप वर पाठवली होती , ती वाचताच मला कोण आनंद झाला , कारण त्या कथेच्या लेखिका १९८९ -९० पासून परिचित असलेल्या कवयित्री , गीतकार , गझलकार प्रा .सुनंदा पाटील यांनी लिहिलेली होती .
सुनंदा पाटील यांनी कथा संग्रहाला *पाचवा कोपरा* हे जे नांव दिले आहे ते एकदम सार्थ आहे . तुम्हा आम्हाला सर्वसाधारणपणे घराचे चार कोपरे माहित असतात . असं असताना पुस्तकाचे नांव *पाचवा कोपरा* वाचल्यावर प्रश्न पडतो , पाचवा कोपरा ? , हा कसा काय ? तर हो , हा *पाचवा कोपरा* प्रत्येकाच्या काळीज कप्यामध्ये असतोच असतो , कसा ते पाटील मॅडम यांनी तो ह्या पहिल्याच कथेतून आणि संग्रहातील इतर कथातूनही मोठ्या खुबीने मांडलेला आहे .
सदर संग्रहातील कथांच्या बाबतीत सारासारपणे विचार केला तर वरकरणी फक्त कथा ज्येष्ठांसाठी किंवा सेवानिवृत्तांसाठी आहेत, असं वाटत असलं, तरी ते तसं नसून यातील प्रत्येक कथा ही आज तरूण असलेल्या आणि उद्या जेष्ठ होऊ घातलेल्या सर्वांसाठी आहे हे विसरून चालणार नाही . या कथांमधीतल ही सूचकता मला फार महत्वाची वाटते आणि लेखिकेला ही तेच अभिप्रेत असणार यात शंका नाही .
*पाचवा कोपरा* संग्रह वाचताना मला काही सुचक मुद्दे लक्षात आले हे असे – – –
*१) -पाचवा कोपरा* —
ज्येष्ठ म्हटलं की सर्वप्रथम नजरेसमोर येतात ते वृद्धाश्रम . वृद्धाश्रम ही जणु काही आजकाल अत्यंत गरजेची बाब झालेली आहे आणि काहींच्या नजरेतून तर फॅशनच झालेली आहे – असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे मला वाटते . पण वृद्धाश्रम या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे ? याचा विचार केला तर नव्या पिढीने आपल्या स्वार्थापोटी आपल्या वृद्ध मातापित्यांना अडगळ – भार समजल्यामुळे आणि दुर्लक्षित केल्यामुळे झालेली आहे . घराघरातून मग तो स्त्री असो की पुरुष असो , त्यांना काय हवं नको ते कोणीच जाणत नाही . त्यांना जगण्यासाठी हवं असतं फक्त दोन वेळचं दोन घासाचं जेवण आणि दुखलं खुपलं तर सेवेसाठी मानसिक आधार . पण तेही नवीन पिढी करत नाही , ही खंत आहे . बऱ्याच वेळा आपण वृद्ध झालो , सेवानिवृत्त झालो म्हणजे काही उपयोगाचे नाही अशी मानसिकता तयार होत असते . तर ते तसं न समजता उरलेल्या आयुष्यात सुद्धा बरेच काही करता येतं हे ह्या कथा संग्रहातील प्रत्येक कथेतून लेखिकेने उत्तम तऱ्हेने मांडूनच नव्हे तर गळी उतरवलं आहे असं म्हणता येईल .
वृद्धाश्रमात राहूनही बरंच काही करता येतं हे श्रद्धा देसाईच्या उदाहरणाने पटवून दिलं आहे ,
२) *मोकळा श्वास* — वृद्धत्वातलं , निवृत्तीनंतरच जगणं म्हणजे काहींच्या अनुभवाने निव्वळ अडगळ असते . पण असं नाही . मुख्यतः बहुतांशपणे तसे नाहीय , पण परिवारातील सदस्यांच्या व असहकारीते मुळे , त्यांना समजून न घेतल्यामुळे , आणि स्वार्थी वृत्तीमुळे , दुर्लक्षितपणामुळे वृद्धात ती मानसिकता तयार होते . याला काही घरातून सून वास कारणीभूत असतो , नाही असे नाही , अशा गोष्टींचा जेव्हा अतिरेक आणि कंटाळा येतो , तेव्हा काही महत्वाकांक्षी मंडळी जाचाला कंटाळून, घराबाहेर पडून इतके दिवस पर्यंत जे काही करू शकले नाहीत , त्याही पेक्षाही अधिक चांगल्या रितीने करून दाखवत असतात . पण , केव्हा? त्यांनी लक्षात आणलं ! तर लक्षात घेतलं ! तर शक्य असतं . पुढे याच कथेत एक महत्त्वाचा मुद्दा वाचकांसमोर मांडला आहे , तो हा की लेखिका ही महिला असूनही त्यांनी पुरुषाच्या मनाचा मनोवैज्ञानिक भूमिकेतून मुद्दा मांडलाय , त्याबद्दल कौतुक करावं करायलाच हवं , नव्हे तो त्यांचा हक्कच बनतो . तो मुद्दा असा आहे की — सर्वसाधारणपणे असा समज आहे की पुरुष हा कठोर असतो पण ते तसं नसतं , या विचाराचं त्यांनी खंडन केलं आहे , हे असं सांगून — ” पुरुषाचं तसं नसतं , ते अश्रू आतल्या साठवत असतात , म्हातारपणी एकटी बाई जगू शकते , पण एकट्या पुरुषाला म्हातारपण काढणं खूप कठीण जातं ” .
३) *भरारी*– सेवानिवृत्तीनंतरचं जीवन किंवा वृद्धत्वाचं जीवन हे एक प्रकारे बोनस लाईफ असतं . प्रपंच करता करता राहून गेलेलं करणं शक्य न झाले असेल तर आपण ह्या दिवसात आपल्या कलागुणांना खतपाणी देऊन वृद्धिंगत करू शकतो . नव्हे त्यात यशस्वीतेची भरारी मारु शकतो , हे सुनीताबाईंनी “सहनिवास ” मध्ये आल्यानंतर करून दाखवलं , हे एक सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण दिलं आहे .
४) *पौरोहित्य*– वय झाल्यावर ही मनात आणलं तर अगदीच अशक्यप्राय वाटणारी अर्थाजनाची गोष्ट म्हणजे पौरोहित्य आणि इतरही . पौरोहित्य हे केवळ उदाहरण आहे .
*सहवास* — आजकाल आपुलकी , माया प्रेम , सहवास , हे फारच दुर्मिळ झालं आहे , एका घरात राहून प्रत्येकजण परक्यासारखा वागत आहे , आज तरुण वयात असणाऱ्यांनी ही कथा जरूर वाचायला हवी , कारण आपण उद्या म्हातारे होणार आहोत , हे त्यांनी विसरू नये , याचसाठी ही बोधकारी कथा आहे , आपल्या मातापित्यांना , आजा आजींना , आपला सहवास , सेवा इत्यादींची गरज असते , याविषयी ही कथा आहे . आपण त्यांच्याशी किती जवळीक साधतो हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारणे गरजेचे आहे . त्यांना मानसिक आधाराची गरज असते , हे अप्रत्यक्षपणे ह्या कथेतून सूचवले आहे .
पुढची कथा आहे *मराठी मी त्याची माता .*
निवृत्त झालो म्हणजे संपलं , वय झालं म्हणजे संपलं , असं काहीच नसतं . असा विचार पटवून देणारी ही कथा , जरी लेखन साहित्य इत्यादी विषयक वाटत असली तरी ती एकूणच अनुभव संपन्न असलेल्या महिलेच्या यशस्वीतेची कहाणी आहे , इतरही सर्वच कथा एक संयत विचार देणाऱ्या आहेत , यातील महत्त्वाचा विचार म्हणजे
” वृद्ध हे अनुभवाची बँक असतात . त्यांना दुर्लक्षित केलं तर , त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादापासून तुम्ही वंचित रहाल आणि नुकसान होईल , हे अप्रत्यक्षरीत्या या कथेतून सूचवलेलेआहे .
*पाचवा कोपरा* ह्या कथा संग्रहातील एकूण एक कथा सकारात्मक दृष्टीतून लिहिलेल्या आहेत, वाचताना वरकरणी जरी वृद्धांसाठी लिहिलेल्या वाटत असल्या तरी त्या सर्वांसाठी आहेत , यातील एकही कथा फक्त मनोरंजनासाठी लिहिलेली नाहीये . आपण कथा वाचत असतो तेव्हा त्यातील घटना आपल्या समक्ष घडत आहे , असलेली किंवा आपल्या घरातील , परिसरातील नातेवाईकातील आहे असंच वाटतं . प्रत्यक्षात अनुभवत आहोत , असं जाणवल्या खेरीज राहत नाही , आणि हेच या कथासंग्रहाचे यश आहे .
स्थळ मर्यादेस्तव मी मोजक्याच कथांवर संक्षिप्त भाष्य केले आहे . यावर बरंच काही लिहिता येईल . पुढील कथासंग्रहासाठी खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा , 💐💐💐💐💐
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
रसग्रहण – *काशिनाथ भारंबे” निर्मोही”*
तळेले काॅलनी – खडका रोड
भुसावळ ४२५२०१
मोबा 9272303212
————————————-
————————————–
*पुस्तकाचे नाव -पाचवा कोपरा*
*लेखिका – प्रा सौ सुनंदा पाटील*
*मोबाईल –84220 89666*
*प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन* *आधारवाडी जेल रोड/कोलिवली*
*कल्याण ( प ) ४२१ ३०१*
*मोबाईल : 9321773163*
