You are currently viewing अमेरिका-इराण आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा

अमेरिका-इराण आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा

निर्यात व्यवस्थेवर परिणाम होऊ देणार नाही – नितेश राणे

JNPA बंदरात अडकलेल्या फळ-भाज्यांच्या कंटेनरप्रकरणी विधानसभेत चर्चा; केंद्राशी समन्वय सुरू असल्याची माहिती

मुंबई :

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला.

विधानसभेत ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी जेएनपीए (JNPA) बंदरात राज्यातील फळे व भाज्यांनी भरलेले निर्यात कंटेनर अडकून पडल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय तणावामुळे निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

यावर उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्य सरकारने या परिस्थितीची तातडीने दखल घेतली असून केंद्र सरकारशी समन्वय सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली असून अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून निर्यात साखळी सुरळीत राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आवश्यक ते निर्णय तातडीने घेतले जातील, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले.

दरम्यान, राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून निर्यातदार, शेतकरी व संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा