फोंडाघाटहून श्री राधाकृष्ण बालगोपाल मंडळाची गुजरात तीर्थयात्रा रवाना
४५ भाविकांचा सहभाग; तीर्थक्षेत्रे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, मोदी स्टेडियमसह विविध स्थळांना भेट
फोंडाघाट :
येथील श्री राधाकृष्ण बालगोपाल मंडळाच्या वतीने गुजरात राज्यातील विविध धार्मिक व पर्यटनस्थळांच्या दर्शनासाठी ४५ जणांचा समूह उत्साहात रवाना झाला. या यात्रेदरम्यान भाविक गुजरातमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांसह जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल स्मारक), नरेंद्र मोदी स्टेडियम, हिरे व्यापारी पेठ तसेच स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचा मार्ग आदी महत्त्वाची स्थळे पाहणार आहेत.
या संपूर्ण यात्रेचे नियोजन, ऑनलाईन बुकिंग, निवास व्यवस्था तसेच अन्य आवश्यक तयारी अतुल कोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे. त्यामुळे सहभागी भाविकांना प्रवासाचा आनंददायी अनुभव मिळणार आहे.
विशेष म्हणजे, याच मंडळाने गेल्या वर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिर दर्शन यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते. त्या यात्रेलाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर यंदा गुजरात दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी कौतुक करत मंडळातील सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक माहिती मिळवून देणारे असे उपक्रम समाजातील एकोपा आणि संस्कार वृद्धिंगत करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
