नेमळे-एरंडकवाडी येथे थार गाडी १५ फूट दरीत कोसळली; ५ जण जखमी, १०८ रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने संताप
सावंतवाडी
झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर नेमळे-एरंडकवाडी येथे आज थार गाडी सुमारे १५ फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह अन्य चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिक आणि उपस्थितांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.
अपघाताची माहिती मिळताच ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होणे अपेक्षित असताना अनेक वेळा संपर्क साधूनही रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने अधिक तत्परतेने प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.
