You are currently viewing लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम

लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम

*लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम*

*परिसरात विषारी धुराचे मोठे लोट; श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात; परिसरात भीतीचे वातावरण*

*लोणी काळभोर (पुणे):*

परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट पसरले असून श्वास घेण्यास त्रास झाल्याने एमआयटी शिक्षण संकुलातील काही विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यरात्री जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले. एमआयटी शिक्षण संकुलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शनिवारीदेखील सुरू होते.

एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या राज्यासह देश-विदेशातून आलेले जवळपास २०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ५,००० विद्यार्थी व १,००० कर्मचारी शैक्षणिक संकुलाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. नदीपात्रात टाकलेल्या कचऱ्याला लागलेली आग अग्निशमन दलाने शुक्रवारी दिवसभर प्रयत्न करूनही विझवता आली नाही. त्यामुळे रात्री ती आणखी वाढून विषारी धुराचे प्रचंड मोठे लोट परिसरात जमा झाले. यामुळे वसतिगृहातील तसेच परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे, घसा बसणे इत्यादी त्रास झाला. तसेच, शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना विषारी धुरामुळे शुक्रवारी मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

विषारी वायूच्या लोटांमुळे परिसरातील दृश्यमानता प्रचंड कमी झाली. याचा परिणाम शनिवारी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवरही झाला. तसेच, या विषारी धुराच्या लोटांमुळे परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना शनिवारी सुट्टी द्यावी लागली. शनिवारी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पोलिस पाटील व स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

स्वच्छ भारत मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वच्छता आणि नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मात्र पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर थेट कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे. लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या पुणे शहराला लागून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. परंतु या ठिकाणी कचरा संकलनासाठी जागा तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक प्रकल्प आजमितीस उपलब्ध नाही.
त्यामुळे नाइलाजास्तव दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा थेट मुळा-मुठा नदीपात्रात टाकला जातो. परिणामी, नदीपात्रात आता कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सदर ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यात आता या कचऱ्याला सातत्याने आग लागण्याचे प्रकार वाढत असल्याने वायुप्रदूषणातही कमालीची वाढ झाली असून परिसरातील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.
नदीपात्रात कचरा टाकल्यामुळे केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर जलप्रदूषणही वाढत असून मुळा-मुठा नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

*कोट*
लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींनी यापूर्वीच अनेक वेळा घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगळी जागा मिळावी यासाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले आहेत. तो अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहे. शासनाकडून दोन्ही ग्रामपंचायतींना तातडीने जागा मिळाल्यास त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारता येईल. त्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रात थेट कचरा टाकणे बंद होईल व पर्यावरणाचा ऱ्हास थांबून परिसरातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहील.
*- चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत*

——————–
पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात थेट कचरा टाकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नदीपात्रात कचऱ्याचे डोंगर उभे असून त्यास सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे विषारी धुराचे लोट तयार होऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना श्वसनाच्या समस्या जाणवत आहेत. जिल्हा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने हस्तक्षेप करावा. नदीपात्रात अवैधरित्या थेट कचरा टाकणे त्वरित थांबवण्यात यावे. विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी.
*- डॉ. महेश चोपडे,*
कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा