विधी सेवा व शासकीय सेवा योजनांच्या महाशिबिराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई, यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १ मार्च २०२६ ला सकाळी १०.३० वाजता रा.ब.अनंत शिवाजी देसाई, टोपीवाला हायस्कूल ता.मालवण येथे विधी सेवा, शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर आयोजीत करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपुर्णा गुंडेवाडी यांनी दिली आहे.
शासकीय योजनांची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहचविणे व जनजागृती करण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती श्याम चांडक, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते न्यायमूर्ती फरहान दुभाष, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच डॉ.सुधीर देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अॅड. संग्राम देसाई, सदस्य महाराष्ट्र अॅड गोवा बार कौन्सिल, अॅड. परिमल नाईक, अध्यक्ष जिल्हा वकील संघ, सिंधुदुर्ग, व अॅड. संदीप राणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता सिंधुदुर्ग यांची उपस्थिती राहणार आहे.
महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, समाज कल्याण कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या योजनांचे स्टॉल याठिकाणी लावण्यात येणार आहेत. शासकीय सेवा योजनांची माहिती नागरिकाना दिली जाणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते शासकीय सेवा व योजनांचा लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
या महाशिबिरास नागरिकानी मोठ्या संख्येत उपस्थित राहून शासकीय सेवा व योजनांची माहिती घेवून त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपुर्णा गुंडेवाडी, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक ८५९१९०३६०७ येथे संपर्क साधावा.
