You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची लिपिक भरती परीक्षा २८ फेब्रुवारीला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची लिपिक भरती परीक्षा २८ फेब्रुवारीला

७३ पदांसाठी आयबीपीएसमार्फत ऑनलाईन परीक्षा

५०७७ अर्जांमुळे केंद्रबदलाचा निर्णय; पारदर्शकता व तांत्रिक सुरक्षिततेबाबत जिल्हा बँकेचा खुलासा

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठीची ऑनलाईन परीक्षा दि. २८/०२/२०२६ रोजी होणार आहे. ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या अधिकृत संस्थेमार्फत घेण्यात येत असून, भरती प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि तांत्रिक शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी आयबीपीएसची निवड करण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

आयबीपीएस ही संस्था आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यरत असून देशातील विश्वासार्ह व मान्यताप्राप्त भरती संस्था म्हणून ओळखली जाते. न्यायालयीन निरीक्षणांतही तिच्या कार्यपद्धतीची नोंद झाल्याचे बँकेने नमूद केले आहे.

५०७७ अर्जांमुळे बदलले परीक्षा केंद्र

लिपिक पदासाठी जिल्हाभरातून तब्बल ५०७७ अर्ज प्राप्त झाले. सुरुवातीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच केंद्रे प्रस्तावित होती. मात्र तांत्रिक व पायाभूत सुविधांची पडताळणी केल्यानंतर सर्व उमेदवारांची परीक्षा एकाच सत्रात घेणे शक्य नसल्याचे आयबीपीएसच्या निदर्शनास आले.

सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर, सर्व्हर लोड मॅनेजमेंट, प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र संगणक (किमान ४ जीबी रॅम), १५ इंची मॉनिटर, यूपीएस व पॉवर बॅकअप, हाय-स्पीड इंटरनेट, बॅकअप लाईन, बायोमेट्रिक कॅप्चर, ऑन-साईट आयटी सपोर्ट, जनरेटर सुविधा अशा आवश्यक निकषांमुळे केंद्रांची अंतिम निवड आयबीपीएसमार्फत करण्यात आली.

निश्चित करण्यात आलेली परीक्षा केंद्रे व उमेदवार संख्या

सिंधुदुर्ग

मेट्रोप्लेटिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुकळवाड – ५० परीक्षार्थी

रत्नागिरी

पी.एस.पी.एस.एस. राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, देवरुख – ९० परीक्षार्थी

पणजी (गोवा)

आयन डिजिटल झोन आयडीझेड पाठोप्लाझा, पणजी – १५० परीक्षार्थी

म्हापसा (गोवा)

फर्स्ट इन्फोटेक ऑफिस, मापसा – १३० परीक्षार्थी

कोल्हापूर

आयएन डिजिटल झोन आयडीझेड, कसबा बावडा – ४७० परीक्षार्थी

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च – १६० परीक्षार्थी

सांगली

वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च – २५० परीक्षार्थी

नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट – १०० परीक्षार्थी

सातारा

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय – १४० परीक्षार्थी

सातारा आयटी पार्क ऑनलाईन परीक्षा केंद्र – ८० परीक्षार्थी

महिला महाविद्यालय, कराड – ९५ परीक्षार्थी

मुंबई

आयडीझेड पवई – ७५८ परीक्षार्थी

पुणे

आयन डिजिटल झोन आयडीझेड हडपसर गेट नं. ३ – ७०० परीक्षार्थी

आयन डिजिटल झोन गेट नं. १ – ७०० परीक्षार्थी

आयएन डिजिटल झोन गेट नं. २ – ७०० परीक्षार्थी

इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल इंजीनियरिंग अँड आयटी पुणे – २४० परीक्षार्थी

डीजी एंटरप्राइजेस, कळंबे न्यू कॉम्प्लेक्स पुणे – ६० परीक्षार्थी

जेपी ऑनलाईन परीक्षा केंद्र पुणे – २०० परीक्षार्थी

 

गैरसमज दूर करण्याचे आवाहन

काही उमेदवारांमध्ये व प्रसारमाध्यमांमध्ये केंद्रांबाबत गैरसमज पसरल्याचे निदर्शनास आल्याने बँकेने हा अधिकृत खुलासा केला आहे.

उमेदवारांना पारदर्शक, सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने परीक्षा देता यावी हा बँकेचा मुख्य उद्देश असून सर्वांनी नियोजित केंद्रावर वेळेत उपस्थित राहून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा