*साळगाव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा…*
कुडाळ | २३ फेब्रुवारी
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साळगाव मतदार संघ विद्यमान जि.प. सदस्य श्री.गंगाराम सडवेलकर उपस्थित होते. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ, झाराप पंचक्रोशीचे अध्यक्ष मा. श्री. मुकुंद धुरी, संस्था सचिव मा. श्री. प्रदीप प्रभूतेंडोंलकर, श्री. सतीश साळगावकर, श्री शांताराम धुरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या प्रास्ताविकाने झाली. शैक्षणिक वर्षाचा अहवाल प्रा. रामदास पास्ते यांनी सादर केला. त्यानंतर विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. स्वप्नाली सिंगनाथ यांनी केले.
श्री गंगाराम सडवेलकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना उत्तम गुरुंचे मार्गदर्शन आत्मसात करणे हे यशाचे गमक असल्याचे सांगितले. तसेच नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना असा उपदेश विद्यार्थ्यांना केला. अध्यक्षीय भाषणात मा. मुकुंद धुरी यांनी महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगतीत प्राचार्य व प्राध्यापकांचा सिंहाचा वाटा असल्याचे अधोरेखित केले आणि भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहील, अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा. भक्ती चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अंकिता नवार यांनी केले. या सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✨ विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी प्रेरणा! ✨
