You are currently viewing घारपी शाळेत हिंद‌ ए चादर यांच्या अमर बलिदानाची भावपूर्ण उजळणी

घारपी शाळेत हिंद‌ ए चादर यांच्या अमर बलिदानाची भावपूर्ण उजळणी

*घारपी शाळेत हिंद‌ ए चादर यांच्या अमर बलिदानाची भावपूर्ण उजळणी*

बांदा

घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश देणारा ‘हिंद एक चादर’ या सामूहिक गीताचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण शाळा परिसर देशप्रेमाच्या सुरांनी निनादला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने व राष्ट्रप्रतिज्ञेने झाली. त्यानंतर शिक्षकांनी शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेतला. धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी त्यांनी दिलेल्या अद्वितीय बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत सांगण्यात आली. “हिंद दी चादर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान विभूतीने मानवतेच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले, ही ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली.
विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या मनात सहिष्णुता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने गीताच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी‘हिंद एक चादर’ हे गीत सामुहिक गायन केले. गीताच्या सुरावटीतून भारताच्या विविधतेत दडलेले ऐक्य, संस्कृतींचा संगम आणि परस्पर सन्मानाचा संदेश प्रभावीपणे व्यक्त झाला.
मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा मूल्याधारित आणि इतिहासाशी निगडित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, मदतनीस संचिता सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
घारपी शाळेच्या या उपक्रमातून संस्कारक्षम शिक्षण, इतिहासाची जाण आणि राष्ट्रनिष्ठा यांचा सुंदर संगम पुन्हा एकदा समाजासमोर अधोरेखित झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा