You are currently viewing “विश्वरत्न आदरणीय अटलजी”….

“विश्वरत्न आदरणीय अटलजी”….

हाच तो दिवस.. ज्या दिवसाचं भारतवर्षासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे.२५ डिसेंबर १९२४.एका बाजूला ग्वाल्हेरमध्ये धर्मगुरू येशु ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा केला जात होता. आपले तमाम ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये प्रार्थना करत होते.घंटा निनादत होत्या आणि दुसऱ्या बाजूला क्रुष्णबिहारी वाजपेयी यांच्या घरात पुत्रजन्म झाला म्हणून आनंदोत्सव साजरा होत होता… आणि हे पुत्ररत्न म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी.
भारतरत्न अटलजी..एक संवेदनशील कवी,परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक, प्रखर राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी, राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेतलेले महामेरु,उत्कृष्ट संसदपटू,रचनात्मक कामासाठीचे समन्वयक,शालिनता,संयम आणि सौजन्य यांचा सुंगधित संगम,संघप्रचारक अटलजी,प्रखर वक्ते अटलजी,भारतवर्षाचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ असलेले अटलजी…आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विचारधारा वेगळी असली तरीही विरोधकांच्याही गळ्यातले “ताईत”असलेले अटलजी यांचा २५ डिसेंबर वाढदिवस. माझ्यासारख्या कोट्यवधी भारतीयांना उर्जा देणारा उर्जादिन.
भारतवर्षाच्या लिहिल्या जाणाऱ्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर अटलजींचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होवूच शकत नाही. अटलजींची प्रत्येक कविता म्हणजे बलशाली भारताच्या निर्मितीसाठी ताकद देणारं टाँनिक..प्रत्येक रचना म्हणजे गौरवशाली भारताचा जयजयकार… शब्दाशब्दाला प्रखर राष्ट्रभक्तीच्या पेटणाऱ्या धगधगत्या मशाली..
पोखरणचा अणूस्फोट म्हणजे महासत्ता अमेरिकेसह अवघ्या विश्वाला दिलेला खणखणीत इशारा..आर्थिक निर्बंधाना भिक न घालता यही है हमारा हिंदुस्थान”याची जाणीव करून देणारा ऐतिहासिक निर्णय.
देशहिताच्या प्रत्येक निर्णयात विरोधी पक्षानाही विश्वासात घेऊन देशासाठी सहमतीचेही राजकारण केले पाहिजे आणि प्रगतीशील भारताचे स्वप्न साकारले पाहिजे यावर ठाम असणारे अटलजी..
संसदेतील आर्थिक सुधारणा, परराष्ट्र धोरण,शिक्षण,पर्यावरण, रोजगार, मुलभूत सुविधा, भारत पाक स़बध,अतिरेकी कारवाया,जलसिंचन, सामाजिक समस्या,सामाजिक समरसता,धर्मनिरपेक्षता,भारतचीन संबध अशा एक ना अनेक विषयावरील अटलजींची भाषणे म्हणजे एक अपूर्व मेजवानी. अटलजी बोलत असताना एरव्ही धिंगाणा घालणारे संसद सदस्यही शांतपणे अटलजींची अभ्यासपूर्ण भाषण ऐकत असत.
सुदैवाने मलाही पणजी,बेळगाव, पुणे,मुंबई येथे अटलजींच्या जाहीर सभा ऐकता आल्या. त्यांच बोलण कधीच संपू नये .असचं वाटायचं.अटलजी म्हणजे हिमालय… आणि या हिमालयाच्या पायथ्याशी असलेले आम्ही छोटेसे दगडगोटे..जे पाण्याच्या छोट्याशा प्रवाहानेही वाहून जातील…पण हिमालय अढळ आणि अटलही…अशा अटलजींच्या नावाने १६ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या अटल प्रतिष्ठानच्या वतीने थोडफार सामाजिक कार्य सातत्याने सुरु ठेवलेलं आहे.या अनुषंगाने आदरणीय अटलजींच्या कवितेच्या ओळी आठवतात….
…पथ हा चालत राहू…
येती संकटे स्वागत करुया…
प्रलयवादळे येती,येऊ द्या…
असती निखारे पायतळी तरी…
अग्नि कोसळी जरी शिरावरी…
निज हातानी आग लावून हासत हासत..
जळतचि राहू…
पथ हा चालत राहू!!
विश्वरत्न अटलजींच्या जयंतीदिनी आदरणीय अटलजींना कोटी कोटी प्रणाम…
…अँड.नकुल पार्सेकर…
संस्थापक अध्यक्ष-अटल प्रतिष्ठान.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 17 =