You are currently viewing “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना”चे आयोजन

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना”चे आयोजन

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना”चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” आयोजित करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील छत्रत्रती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान  शिबीरे अभियान टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात एक दिवसीय समाधान शिबीरांचे महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर आयोजन करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त आहेत.  त्यानुसार जिल्ह्यात ८ तालुके असून त्यामध्ये एकूण ५७ मंडळे असून तालुकानिहाय मंडळांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत. देवगड (८), वैभववाडी (४), कणकवली (९), मालवण (९), कुडाळ (१०), वेंगुर्ला (५), सावंतवाडी (८) व दोडामार्ग (४) अशी तालुकानिहाय मंडळांची संख्या आहे.

तसेच जिल्ह्यात एकूण ८ नगरपरिषद/नगरपंचायत अस्तित्वात आहेत. एकूण ५७ मंडळ स्तरावर तसेच एकूण ८ नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर या शिबिराच्या अनुषंगाने कारावयाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे नियोजन शासनाकडून प्राप्त आहे.

या अभियानाअंतर्गत मंडळ स्तरावर शिबिरांसाठी १८ फेब्रुवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ दरम्यान पूर्वतयारी करण्यात येणार आहे.  माहे मार्च महिन्यात ७, १४ व २८ मार्च २०२६ रोजी (ज्या तालुक्यात सहापेक्षा जास्त  मंडळे आहेत. त्या ठिकाणी) मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच एप्रिल महिन्यात १०, १७ व २४ एप्रिल २०२६ रोजी (ज्या तालुक्यात सहापेक्षा अधिक मंडळे आहेत. त्या ठिकाणी) मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत.  यानंतर माहे  मे  मध्ये नगरपंचायत, नगरपरिषद स्तरावर ८ व १५ मे २०२६ रोजी (ज्या तालुक्यात सातपेक्षा जास्त मंडळे आहेत) तसेच २२ मे २०२६ रोजी (ज्या तालुक्यात आठ पेक्षा जास्त मंडळे आहेत) शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत.

या अभियानामध्ये जिल्हास्तरीय विभागांना शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता निर्देशित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी यांची नेमणूक प्रत्येक तालुकाकरीता या शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

या मोहिमेमध्ये पुढील सेवा प्राधान्याने देण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत.

१) प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे.

२) अभिलेख दुरुस्ती

३) लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत येणाऱ्या अर्जाचा निपटारा

४) अकृषिक तरतुदीसंदर्भातील नव्याने प्राप्त सुधारणांबाबत मार्गदर्शन

५) भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी देण्यात आलेल्या प्रकरणांची कमी जास्त पत्रके तयार

करुन गांव दप्तर अद्ययावत करणे.

६) भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतर करणे.

७) सर्व गावामध्ये ७/१२ वाचन पूर्ण करुन प्रलंबित नोंदीच्या याद्या तयार करुन त्यानुषंगाने दुरुस्तीबाबत

कार्यवाही पूर्ण करणे.

८) सामाजिक अर्थसहाय योजनाअंतर्ग पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेऊन मंजूरीबाबत कार्यवाही पूर्ण

करुन शिबिरामध्ये आदेशाचे वितरण करणे.

९) प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरणबाबत गांवनिहाय

यादी तयार करुन अशा अनोंदणीकृत व्यवहाराविषयी माहिती जमा करणे. आणि अशी माहिती

नोंदणीकरीता नोंदणीविभागाकडे पाठविणे. व त्यानुषंगाने ७/१२ अद्ययावत करुन त्याचे वाटप करणे.

१०) पाणंद रस्त्याची प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिनांक १४/१२/२०२५ च्या शासन निर्णयानुसार

उपविभाग स्तरीय समितीने ग्रामपंचायतला उपलब्ध करुन देणे.

११) सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टेवाटपाची कार्यवाही पूर्ण करणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा