मालवण आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बसेस दाखल
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांचा एसटी प्रवास अधिक सुखकर होणार
मालवण
मालवण एसटी आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस रविवारी दाखल झाल्या. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बसेस मालवण आगाराला उपलब्ध झाल्या असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
मालवण तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि एसटी सेवेची गरज लक्षात घेऊन नव्या बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ‘राजमाता जिजाऊ’ मालिकेतील पाच आधुनिक बसेस आगाराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर विविध मार्गांवरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मालवण आगाराला आगामी काळात आणखी काही नव्या बसेस प्राप्त होणार असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांनाही अधिक चांगली एसटी सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या बसेस आगारात दाखल झाल्याने एसटी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
