ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर घसरला; बांदा पोलिस तपासणी नाक्याजवळ अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली; वर्षभरापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
बांदा
ब्रेक निकामी झाल्यामुळे बांदा येथील पोलिस तपासणी नाक्यासमोर एका कंटेनरचा अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंटेनरचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून जाणारा कंटेनर बांदा पोलिस तपासणी नाक्याजवळ पोहोचताच त्याचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला घसरला. ही घटना तपासणी नाक्यापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर घडल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, याच ठिकाणी सुमारे वर्षभरापूर्वी अशाच प्रकारचा अपघात घडला होता. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
