You are currently viewing ज्वलंत व्याप्ती

ज्वलंत व्याप्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ज्वलंत व्याप्ती*

 

घटस्फोटाच्या ज्वालामुखीची

ज्वलंत व्याप्ती घराघरात

धुमसणाऱ्या राखेखाली

वन्ही चेततोय दोन मनात

 

प्रेमाची मशागत करून

फुलवतो संसाराची फुलबाग

का वेढुन वैशाख-वणवा

करपवुन टाकते आग

 

वडिलधाऱ्यांनी बांधलेली

दोन जिवांची रेशीमगाठ

दोषारोपांच्या ओढाताणीत

बनते न सुटणारी निरगाठ

 

संस्कारांचे जल शिंपुन

शांत करावा ज्वालामुखी

घटस्फोट घेतल्यानंतर तरी

खरंच कोणी होतंय सुखी?

 

एक पाऊल पुढे, एक मागे

दोघांचीही पुन्हा बहरेल प्रीत

नसे कुरघोडी, मानापमान

कोणाचीच नसे हारजीत

 

कापावे ना परतीचे दोर

ससेहोलपट होते मुलांची

निकोप वाढीसाठी त्यांच्या

जरूरत असे आईबापाची

 

शब्दांच्या लाव्हारसांचा

कृष्ण खडक काळजात

मारहाण, अपमान, उपेक्षा

असंस्कृत-सुशिक्षितांत

 

असह्य, जाचक हुकूमशाही

कडेलोट सहनशक्तीचा

निरूपायाने स्वीकारार्ह

पर्याय अखेरी घटस्फोटाचा

 

@भारती महाजन-रायबागकर,चेन्नई

©®या स्वरचित कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा