माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांची मंत्री नितेश राणेंकडे निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी :
राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या मुंबई ते मालवण जलदगती प्रवासी बोट वाहतुकीचे कोकणवासीयांकडून जोरदार स्वागत होत असताना, ही सेवा वेंगुर्ला तालुक्यातील ऐतिहासिक रेडी बंदरापर्यंत विस्तारीत करण्याची जोरदार मागणी जोर धरत आहे. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती श्री. मंगेश तळवणेकर यांनी मंत्री राणे यांना सविस्तर पत्र लिहून या भागातील लोकांच्या भावना आणि गरजांकडे लक्ष वेधले आहे. या मागणीमुळे कोकणच्या एका टोकावर असलेल्या आणि अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने भाऊचा धक्का ते रत्नागिरी, विजयदुर्ग आणि मालवण अशी जलदगतीची प्रवासी बोट सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते मालवण हे अंतर केवळ पाच तासांत कापणे शक्य होणार असल्याने कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
श्री. मंगेश तळवणेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, ही बोटसेवा रेडी बंदरापर्यंत वाढवल्यास त्याचा थेट फायदा रेडी, वेंगुर्ला, शिरोडा, मोचेमाड, सातार्डा, सातोसे, आरोंदा या ‘दशक्रोशी’तील गावांना होईल. सध्या या भागातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी सावंतवाडी रोड (मळगाव) तर राष्ट्रीय महामार्गासाठी बांदा किंवा मळगाव गाठावे लागते. विमानसेवेसाठी मोपा (गोवा), वास्को, किंवा चिपी येथे जावे लागते. या सर्व प्रवासात मोठा वेळ आणि पैसा खर्च होतो. रेडीपर्यंत थेट बोटसेवा सुरू झाल्यास या भागातील लोकांचा प्रवास अत्यंत सुलभ, जलद आणि कमी खर्चात होईल रेडी हे एक नैसर्गिक आणि सुसज्ज बंदर असून, ऐतिहासिक काळात ते व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होते. या प्रवासी वाहतुकीमुळे रेडी बंदराचे गतवैभव पुन्हा प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
श्री. तळवणेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, “यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि कोकणवासीयांचे प्रवासी जलवाहतुकीचे ५० वर्षांचे स्वप्न सत्यात उतरेल.”या पत्रात श्री. तळवणेकर यांनी कोकणच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री माननीय मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न साकारले, तर रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्यामुळे चौपदरी महामार्ग अस्तित्वात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार माननीय नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे चिपी विमानतळ सुरू झाले. आता आपण (नितेश राणे) प्रवासी बोट वाहतूक सुरू करून या नामवंतांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.”या पार्श्वभूमीवर, मंत्री नितेश राणे हे या मागणीचा सकारात्मक विचार करून रेडी, वेंगुर्ला परिसरातील लाखो लोकांना दिलासा देतील आणि कोकणच्या सर्वांगीण विकासाला गती देतील, अशी अपेक्षा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.