You are currently viewing सत्तासंघर्षात सिंधुदुर्गात भाजप जिंकले… भाजपच हरले….
Oplus_16908288

सत्तासंघर्षात सिंधुदुर्गात भाजप जिंकले… भाजपच हरले….

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हापरिषदेची निवडणूक भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. खास.नारायण राणे जिल्ह्यात महायुतीसाठी आग्रही राहिले. त्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते पालकमंत्री नाम.नितेश राणे, आम.दिपक केसरकर, आम.निलेश राणे यांच्यासह बोलणी होऊन सिंधुदुर्गातील निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या गेल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याच्या सत्तेची चावी कोणाकडे असावी यासाठीचा संघर्ष एवढा शिगेला पोचला की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी (अप) यांची महायुती होऊनही भाजपच्याच शत् प्रतिशत् भाजपचा नारा देणाऱ्या आणि महायुती मान्य नसलेल्या गटाकडून सावंतवाडीसह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अपक्ष उमेदवार उभे केले गेले, किंबहुना अपक्षांना अदृश्य हातांनी सर्वतोपरी पाठबळ दिले गेले. यावेळी अपक्षांच्या पाठीवर हात ठेवणाऱ्या कुणाचेही चेहरे समोर आले नाहीत. परंतु, काहीच महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप मध्ये प्रवेश केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तिकीट नाकारून बऱ्याच ठिकाणी राणेंच्या समर्थकांना तिकीट देण्यात आले. परिणामी जिल्हाभर अपक्षांचे पेव फुटले आणि कधी नव्हे तेवढे अपक्ष सर्वत्र उभे करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अर्थात खास.नारायण राणे आणि आम.दिपक केसरकर यांना जोरदार धक्का बसला. कारण, सावंतवाडी तालुका हा मुख्यतः बंडखोरीसाठी अग्रेसर राहिला. या तालुक्यातील सावंतवाडीचे शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि खास.नारायण राणे यांचे समर्थक भाजपा मधील अंतर्गत विरोधकांच्या टार्गेटवर राहिले. याला कारणीभूत कदाचित अलीकडेच नारायण राणे समर्थकांची “सिंधुदुर्गात एकच ना. रा.” असे फलक झळकावत झालेली भव्य सभा देखील आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे भाजपा मधील चव्हाण समर्थक गट आक्रमक झाला आणि जिल्ह्यातील काही मतदारसंघांसह मुख्यतः सावंतवाडी तालुक्यात अपक्षांची संख्या प्रत्येक मतदारसंघात वाढत गेली. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अपक्ष उमेदवार कधीही सावंतवाडी मतदारसंघाने उभे राहिलेले आणि निवडून आलेले सुद्धा पाहिले नव्हते, तेवढे उमेदवार यावेळी निवडणुकीला सहज सामोरे गेले आणि अदृश्य हातांच्या सहकाऱ्याने निवडून देखील आले. या अपक्ष उमेदवारांना भाजप मधील अदृश्य शक्तीच्या आशीर्वादांवर युवाशक्तीने जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपा, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रचारातही कमी पडले आणि निवडून येण्यातही असफल झाले. परिणामी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हरले…तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार जिंकले. त्यामुळे सिंधुदुर्गात “भाजप जिंकले…आणि भाजपच हरले” अशी परिस्थिती निर्माण झाली, हा महायुतीला बसलेला जबरदस्त धक्का आहे. राजकारणाची बदलेली ही दिशा आणि झालेली दशा पाहता भाजपच्या भविष्यातील वाटचालीसाठी नक्कीच धोकादायक ठरणार आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव आणि माडखोल या महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांमध्ये अपक्ष उमेदवारांनी बाजी मारल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोलगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे स्थानिक नेते आणि नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे महेश सारंग यांचा सामना अलीकडेच विशाल परब यांच्या नेतृत्वात व रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपवाशी झालेले आणि अपक्ष उमेदवारी दाखल केल्यावर पक्षातून निलंबित केले गेलेले अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्याशी झाला. या अत्यंत अटीतटीच्या आणि लक्षवेधी लढतीत अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी महेश सारंग यांचा पराभव करत विजय मिळवला. तशीच परिस्थिती माडखोल जिल्हा परिषद गटातही पहायला मिळाली. येथे प्रस्थापित नेत्यांना नाकारत मतदारांनी अपक्ष उमेदवार शिवानी संजय नाईक यांच्या पारड्यात आपले मत टाकले आणि त्या विजयी झाल्या. विशेष म्हणजे माडखोलमध्ये केवळ जिल्हा परिषद गटातच नव्हे, तर पंचायत समितीच्या जागांवरही अपक्षांनीच वर्चस्व गाजवले. माडखोल पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवार अवनी राऊळ यांनी बाजी मारली आहे, तर कलंबिस्त पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवार प्रथमेश सावंत यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. येथे महायुतीला भाजपच्याच बंडखोरांच्या आव्हानाचा मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या बंडखोर अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी कोणाची अदृश्य शक्ती होती हे निकाल लागल्यावर विजयी उमेदवारांसोबत कोण गुलाल उधळत होते या फोटोंमधून स्पष्ट झाले आणि जिल्ह्यात चव्हाण विरुद्ध राणे, केसरकर हे शीतयुद्ध सुरू असल्याचे जग जाहीर झाले आहे.

एकीकडे सावंतवाडी तालुक्यात अपक्षांनी महायुतीला धक्का दिलेला असताना सावंतवाडीतील तळवडे जिल्हा परिषद गटात मात्र स्थानिक उमेदवार नसूनही भाजपचे उमेदवार संदीप गावडे यांनी बाजी मारली. या मतदारसंघात त्यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रूपेश राऊळ यांच्यात प्रमुख लढत झाली होती. येथे राणे समर्थक स्थानिक उमेदवार प्रमोद गावडे यांना उमेदवारी नाकारून बाहेरील मतदारसंघातील उमेदवार लादलेला असतानाही या सरळ लढतीत संदीप गावडे यांनी बाजी मारत भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे इतरत्र भाजपचे स्थानिक उमेदवार आपल्या मतदारसंघात पराभूत होऊन अपक्ष निवडून येत असताना दुसऱ्या मतदारसंघात उभे राहून संदीप गावडे निवडून येतात तिथेही अदृश्य शक्ती कार्यरत होती यावर शिक्कामोर्तब होत आहे.

गेली ३५ वर्षे बांदा मतदारसंघात भाजपची सत्ता होती. बांदा जिल्हापरिषद मतदारसंघ बिनविरोध होऊन तेथून कामत जिल्हापरिषदेवर गेले. त्यामुळे आपल्याला सहज विजय मिळेल या भ्रमात असलेल्या भाजपच्या उमेदवार रुपाली शिरसाट यांच्यासह बांदा भाजपच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना असलेला अती आत्मविश्वास नडला आणि “न भूतो न भविष्यती” असा विजय अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या सौ.ऋतिका संदेश नाईक यांच्या पदरात पडला. त्यामुळे बांदा येथे धनशक्तीवर जनशक्तीने विजय मिळविल्याचे दिसून आले.

कोलगाव, इन्सुली, माडखोल आदी जिल्हा परिषद, माजगाव, माडखोल, कलंबिस्त पंचायत समिती असे काही निकाल पाहिले की, ही निवडणूक भविष्यात लोकशाही प्रक्रियेसाठी मारक असून ही निवडणूक नसून मतदारांचा सौदा होत असल्याचे दिसून येते. हा विजय अपक्षांचा नाहीच आहे आणि अपक्ष विजयी होणे ही सावंतवाडीची किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्याची परंपरा नाहीच आहे तर हा विजय म्हणजे भाजप मधील अंतर्गत गटबाजी आणि चढाओढीच्या राजकारणामुळे भाजपच्याच बंडखोर अदृश्य शक्तीचा विजय आहे. कोणी कितीही म्हणू देत आपल्यावर अन्याय झाला म्हणून जनतेने त्याचा बदला घेतला पण.., हा जनतेने, जनशक्तीने दिलेला कौल नसून धनशक्तीने जबरदस्ती मिळवलेला फसवा कौल आहे.

काल जनतेच्या आणि मित्रपक्षांच्या डोळ्यात धूळ फेकून निलंबित झालेले भाजपचे निवडून आलेले अपक्ष उमेदवार उद्या पुन्हा भाजप मध्ये प्रवेशकर्ते होतील. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जशी विशाल परब यांना संधी दिली तशीच त्यांनाही संधी देईल…परंतु.., आजच्या घडीला भाजप बंडखोर अपक्षांच्या विजयाने सिंधुदुर्गात “भाजप जिंकला…..आणि भाजपच हरला” हे मात्र निश्चित…!

प्रतिक्रिया व्यक्त करा