You are currently viewing माणसाचे यश निश्चय शक्तीवर अवलंबून असते

माणसाचे यश निश्चय शक्तीवर अवलंबून असते

*लेखक कवी पत्रकार ॲड रुपेश पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माणसाचे यश निश्चय शक्तीवर अवलंबून असते*

 

माणसाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्याला संघर्षाला तोंड देऊन मजबूत उभे राहावे लागते. तसे उभे राहण्याकरता माणसाला निश्चय शक्तीची गरज लागते. निश्चयशक्ती ही मनाच्या आणि विचारांच्या परिपूर्णतेतून येत असते. एखादी गोष्ट करायची झाली, की आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जावे लागते. त्या गोष्टीची मूळ कथा आपल्याला कळली, की आपली विचार, भावना पक्की होते, मग आपण मनाशी निश्चय करतो. अशाप्रकारे केलेला मनाचा निश्चय खोलवर जाणीवेत रुजतो, मग माणूस हळूहळू आपल्या यशाकडे जाऊ लागतो. कारण आपल्या मनाच्या निश्चयात खूप मोठे बळ असते पण या निश्चय शक्तीला परिश्रम, प्रयत्न, आत्मविश्वास, सातत्य व संकल्प या सर्व माणसाच्या मूलभूत प्रेरणा आपल्यासोबत असाव्या लागतात. या सर्व प्रेरणांचा एकत्र काला झाला, की माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो. त्या यशोशिखरावर पोहोचताना माणसाला काही भावनांचे भान ठेवावे लागते. आपल्या निश्चय शक्तीमुळे दुसऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. आपला निश्चय हा कायम आत्मविश्वासातून यायला हवा. दुसऱ्याशी स्पर्धा करायची म्हणून फाजील निश्चय करू नये. त्या निश्चयात आपले व आपल्या माणसांचे भले असावे. स्वार्थ, आधाशीपणा अजिबात त्यात नसावा. केवळ फक्त मूलभूत स्वार्थ आपला असावा, आपले ध्येय साधेपर्यंत. नंतर मात्र समाजशीलतेने आपण आपल्या निश्चयाच्या जोरावर अनेक यशोशिखरांना पार करावे.

 

या आरपारच्या लढाईत मात्र आपण कधीही माणुसकी धर्म सोडू नये. ज्यांनी आपल्याला या सर्व कार्यात सहकार्य दिले त्यांनाही कधी विसरू नये. मनात ईश्वराविषयी प्रत्येक वेळी आत्मिक श्रद्धा ठेवावी. सर्व लोक श्रद्धात्मक भाव पाळतात म्हणून आपण कोणत्यातरी देवाला हार घालून पूजा करावी असे आपण करू नये. आपल्या ईश्वराने आपल्याला कोणती शक्ती बहाल केली आहे, हे लक्षात घेऊन आपण त्या त्या देवाचे स्मरण करावे. डोळे बंद केल्यावर आपल्याला त्या देवाची मूर्ती दिसली पाहिजे. आपला देव मनाच्या जाणीवेत पूर्णपणे वसायला हवा. म्हणजे आपले परिश्रम व ईश्वर श्रद्धा या जोरावर आपली निश्चयशक्ती अवलंबून असते. श्रद्धा, सबुरी आणि प्रयत्नशिवाय आपल्याला यशाकडे जाता येत नाही. यश हा शब्द काळ चक्राला बांधला गेलेला आहे. त्यामुळे काळाला पकडून ठेवून आपल्याला यश साधावे लागते. काळाच्या दोन पावले पुढे जाऊन आपण ते करू शकतो परंतु ते करताना आपल्या मनात नम्रता ठेवावी लागते. कारण काळाच्या पुढे जाणारी माणसे हळूहळू माणसाशी नाते तोडू लागतात.

त्यांना असे वाटते. बाकी सर्व लोक नगण्य आहेत, माझ्यातला मी फक्त सामर्थ्यवान आहे. अशी भावना करून घेणे म्हणजे पुढे आपला घात करणे आहे. म्हणून माणसाने श्रद्धा, सबुरी आणि प्रयत्न यांना महत्त्व दिले पाहिजे तरच आपण जमिनीवर राहू शकतो.

 

निश्चयशक्ती ही लहू चुंबकासारखी असते, ती ताबडतोब स्वीकारावी लागते. बघू, करू, करता येईल असे म्हटल्यावर माणसाकडे निश्चयशक्ती कधीच येत नाही. एखादी संधी आपल्याकडे येते तेव्हा ती वेगाने येते. त्यावेळी त्या संधीला आकर्षित करून, आपल्या निश्चय शक्तीत समरस करून घ्यावे लागते. म्हणजे एखादा चेंडू वेगाने बॅटिंग करणाऱ्याकडे येतो तेव्हा वेळ न दवडता निश्चय करून, त्या क्रिकेटरला तो चेंडू षटकाराकडे किंवा चौकाराकडे वळवावा लागतो. त्याकरिता त्याला श्रद्धा, सबुरी,प्रयत्न चौफेर दृष्टी सर्वकाही एकाच वेळेला करावे लागते. त्याकरता तो क्रिकेटर बालपणापासून क्रिकेट सराव करत असतो. तसा सराव केल्यामुळे त्याला अद्भुत यश प्राप्त होते. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात असा डाव कायम सुरू असतो. तो डाव खेळावा, की नाही हे आपले आपण ठरवायचे असते. कारण कोणतीही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. जी संधी आली आहे, त्या संधीला उत्तुंग यशाकडे वळवायचे असते हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे तरच आपल्याला सर्वसामान्य व असामान्य यश मिळू शकते. आपण जर उत्तुंग यशाचा विचार केला नाही तर सर्वसामान्य यश देखील आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे. निश्चय शक्तीला प्राधान्य देऊन, अभ्यासपूर्वक आत्मविश्वासाने आपल्या निश्चयशक्तीला बळ द्या, मगच आपल्याला कायम स्वरूपी यशस्वी होता येते. सर्व प्रकारचा संघर्ष पार करता येतो.

 

ॲड.रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा