“विक्रांत सावंत यांचाच विजय, उबाठा उमेदवाराला उरलेले तीन दिवस मानसन्मान द्या” – सभेतून घणाघाती टोला
सावंतवाडी :
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असून ही जागा बिनविरोध होणार होती. मात्र, आमच्याच काही लोकांनी काड्या केल्यामुळे निवडणूक लागली, असा जोरदार टोला पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना लगावला.
ते पुढे म्हणाले की, उरलेले केवळ तीन दिवस उबाठाच्या उमेदवाराला मानसन्मान द्या. कारण विजय हा विक्रांत सावंत यांचाच होणार आहे. ही निवडणूक आता केवळ औपचारिकता उरली असून जनतेने आपला कौल आधीच महायुतीच्या बाजूने दिला आहे.
यावेळी त्यांनी रेश्मा सावंत यांचा दाखला देत सांगितले की, त्यांनी ९० टक्के मॅच जिंकली असून आता फक्त बॅट उंचावायची शिल्लक आहे. या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या, विकासाची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी राहील, असा विश्वास त्यांनी दिला.
सोबत आमदार दीपक केसरकर असल्याने कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. पार्लमेंटपासून पंचायतपर्यंत सत्ता आपल्या हातात आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, “ही निवडणूक होऊ देत, ९ तारखेनंतर बोलेनच. कारण आमच्या जिभेला हाड नाही,” असा सूचक इशाराही राणेंनी दिला. तसेच विक्रांत सावंत यांना आशीर्वाद द्या, भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
विरोधकांकडे सत्ता नाही, त्यामुळे ते विकासनिधी देऊ शकत नाहीत. विकास करण्याची धमक फक्त आमच्यात आहे. म्हणूनच महायुतीला साथ द्या, असे ठाम आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
