You are currently viewing बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजची विद्यार्थिनी आर्या नागवेकर राष्ट्रीय स्तरावर अव्वल ७५ मध्ये

बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजची विद्यार्थिनी आर्या नागवेकर राष्ट्रीय स्तरावर अव्वल ७५ मध्ये

बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजची विद्यार्थिनी आर्या नागवेकर राष्ट्रीय स्तरावर अव्वल ७५ मध्ये

‘PMVision2Art’ स्पर्धेत यश; ३००० कलाकृतींमधून निवड, २० एप्रिलला मुंबईत सन्मान

सावंतवाडी

येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टची तृतीय वर्षातील विद्यार्थिनी आर्या नागवेकर हिने आपल्या कलाविष्काराच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘PMVision2Art’ या प्रतिष्ठित उपक्रमासाठी तिच्या कलाकृतीची निवड झाली असून, देशभरातील ७५ उत्कृष्ट विजेत्यांमध्ये तिने स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या प्रगतीविषयी जनजागृती करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे ३००० कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. या अफाट स्पर्धेतून आर्याने आपल्या कल्पकतेच्या जोरावर अंतिम ७५ विजेत्यांमध्ये स्थान मिळवत कोकणच्या कलावैभवाचा ठसा उमटवला आहे.
या यशाबद्दल आर्याला मुंबई येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हा सोहळा पार पडणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या उपस्थितीत तिचा सन्मान केला जाणार आहे.
आर्याच्या या यशामुळे बांदेकर फाईन आर्ट कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. संस्थेचे अध्यक्ष रमेश भाट, प्राचार्य उदय वेले, प्रा. सिद्धेश नेरुरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा