You are currently viewing मणेरी पंचायत समितीत अपक्ष प्रविण गवस यांचा दावा

मणेरी पंचायत समितीत अपक्ष प्रविण गवस यांचा दावा

मणेरी पंचायत समितीत अपक्ष प्रविण गवस यांचा दावा — “यंदा मतदारसंघात नवा इतिहास घडणार”

दोडामार्ग

मणेरी पंचायत समिती मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, अपक्ष उमेदवार प्रविण गवस यांनी यंदाची निवडणूक वेगळा इतिहास घडवणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या घरोघरी सुरू असलेल्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
प्रविण गवस सध्या मतदारसंघातील वस्ती, पाडे आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचत थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण, वीज तसेच युवक व महिलांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी मांडले. निवडून आल्यास या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“पक्षीय राजकारणापेक्षा सर्वसामान्य जनतेचा विकास महत्त्वाचा आहे. नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने मी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, मतदारांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे,” असे प्रविण गवस यांनी सांगितले.
साधी प्रचारशैली, थेट संवाद आणि स्पष्ट भूमिका यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.
एकूणच प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता, मणेरी पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, प्रविण गवस यांच्या “इतिहास घडणार” या दाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा