नेरूर जि.प.मतदारसंघात पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी–ठाकरे शिवसेनेचा प्रचार शिगेला!
रूपेश पावसकर-दिप्ती नाईक-अर्चना बंगे यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणा-या नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद उमेदवार रूपेश पावसकर, नेरूर (उत्तर) पंचायत समिती उमेदवार दिप्ती प्रदीप नाईक तसेच नेरूर (दक्षिण) पंचायत समिती उमेदवार अर्चना अतुल बंगे यांनी प्रचाराला वेग देत मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू ठेवला आहे.
मतदारसंघात प्रचार फेऱ्या, घरोघरी भेटीगाठी यांवर अधिक भर देण्यात येत असून, विकासाचा वचननामा थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. प्रचार फेऱ्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा प्रतिसाद विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास जिल्हा परिषद उमेदवार रूपेश पावसकर यांच्यासह पंचायत समिती उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात महायुती विरुद्ध नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी – ठाकरे शिवसेना अशी थेट लढत रंगली आहे. पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवारांनी प्रचाराचा जोरदार झंझावात कायम ठेवत नेरूरसह सरंबळ, वालावल, हुमरमळा, चेंदवण, कवठी आदी गावांमध्ये प्रचार फेऱ्या काढल्या. गावागावांत बैठका, प्रचार फेऱ्या व घराघरांत संपर्क साधत प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. या सकारात्मक प्रतिसादावरून नेरूर देऊळवाडा मतदारसंघात आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
