You are currently viewing राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ; सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ; सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

मुंबई :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली.

यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉलमध्ये मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी अत्यंत साधेपणाने पार पडला. आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव व राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी शपथ घेताच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आणि समर्थकांनी “अजित पवार अमर रहे” च्या घोषणा दिल्या. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे, मात्र सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे. अवघ्या दहा मिनिटांत, कोणताही गाजावाजा न करता पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. शनिवारी सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळातील गटनेतेपदाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आणि सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड निश्चित झाली.

यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे आदी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले. गटनेतेपदी निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पत्र राज्यपालांकडे पाठवले आणि संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडला.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या दहाव्या दिवसापर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार असून, दुखवट्याच्या काळात कोणतेही हार, तुरा किंवा सत्कार स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात साधेपणा, संवेदनशीलता आणि जबाबदारी यांनाच प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा