You are currently viewing अमृत महोत्सवानिमित्त राठी विद्यालय आणि मी 

अमृत महोत्सवानिमित्त राठी विद्यालय आणि मी 

 

अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री गणेशदास राठी छात्रालय समितीच्या अमृत महोत्सवास प्रारंभ झालेला आहे. आमचे मित्र श्री महेंद्र भुतडा यांनी रक्तदान समितीतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करून या अमृत महोत्सवाची सुरुवात केली आहे. या श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचा एक घटक म्हणून मी हा लेख लिहावयास घेतला आहे. श्री गणेशदास राठी छात्रालय समिती व मी यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि तो दीर्घकाळचा आहे.

 

मी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथे राहणारा. माझे वडील श्री विठ्ठलराव काठोळे हे श्री परसरामजी कासट यांच्याकडे घरगडी म्हणून काम करीत होते. त्यांना मरताना शेवटचे पाणी माझ्या वडिलांनी पाजले. श्री परसरामजी कासट यांना आपल्या चिरंजीवास म्हणजे प्रा. एस पी कासट यांना माझ्या वडिलांकडे लक्ष दे असे सांगितले. प्रा. एस पी कासट यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून वडिलांना तेव्हाच्या राज महाविद्यालय म्हणजे आताच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात चपराशी म्हणून नेमले. पगार होता फक्त 25 रुपये. पण त्या काळात २५ रुपयाला देखील खूप किंमत होती.

 

श्री गणेशदास राठी छात्रालय समितीद्वारा संचालित छात्रालयाच्या

या इमारतीमध्ये राज महाविद्यालय सुरू झाले. छात्रालयासाठी कलेक्टर ऑफिस जवळील संस्थेची इमारत हस्तांतरित करण्यात आली.

माझ्या वडिलांची श्री गणेश राठी छात्रालय समितीद्वारा

संचालित महाविद्यालयामध्ये नेमणूक झाल्यानंतर एक गोष्ट चांगली झाली होती .ती ही की छात्रालयाची मेस आम्हाला राहायला मिळाली. मेस एकाच खोलीत होती. परंतु बरीच मोठी होती. वडील चपराशी असल्यामुळे सगळे वर्तमानपत्र सगळे मासिक तसेच पत्रव्यवहार पोस्टमन आमच्याच घरी टाकायचा.

 

आमचे घर ते महाविद्यालय यामध्ये वीस पंचवीस फुटाचे अंतर होते. सकाळी पेपरवाला लवकर यायचा. तेव्हा महाविद्यालय उघडलेले नसायचे .त्यामुळे पेपर आमच्याच घरी यायचे. पुढे मला वर्तमानपत्र वाचण्याचा छंद लागला व तो पुढे वाचन व लेखन याकडे मला नकळत घेऊन गेला.

 

बाबांना अमरावतीला नोकरी मिळाल्यामुळे आम्ही सर्वजण अमरावतीला आलो. माझे नाव श्री गणेशदास राठी छात्रालय समितीच्या श्री गणेशदास राठी विद्यालयात टाकण्यात आले. शाळा व आमचे घर हे पाचशे मीटरचे अंतर होते. शाळेचे घंटी आमच्या घरी ऐकू यायची.

 

मी वर्ग सहा ते वर्ग दहापर्यंत या राठी विद्यालयात शिकलो. नववी व दहावीला आम्हाला मराठी व संस्कृत शिकवायला श्रीमती शोभना मोहरील मॅडम होत्या. त्या संस्कृत आणि मराठी शिकवायच्या. मन लावून शिकवायच्या. त्यामुळे माझ्या मनातील वाचन व लेखनविषयी भावना वाढीस लागली. आम्हाला सर्वश्री श्री नाना सपकाळ श्री मते सर श्री मेश्राम सर श्रीमती हिर्लेकर मॅडम श्रीमती पांडे मॅडम वसंतराव डुडूल सुभाष भट्टड हिरोळे सर पांडे सर जैन सर शर्मा सर यादव सर शाहू सर तिवारी सर शिकवायला होते.

आम्ही शिकत असताना श्री जगन्नाथ माहेश्वरी हे मुख्याध्यापक होते.

 

माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी राठी विद्यालयात सहाव्या वर्गात असताना दिले. खरे म्हणजे मी सातेगावसारख्या ग्रामीण भागातून आलेला. त्यातही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा मुलगा. अंगावर नीट कपडे नाहीत. पुस्तके बुक बँकतर्फे शाळेतून मिळाले म्हणून बरे झाले. माझी शैक्षणिक प्रगती चांगली होती. घरी महाविद्यालयातील सर्वच वर्तमानपत्रं येत असल्यामुळे व माझे वाचन चांगले झाल्यामुळे माझ्यात प्रगती होत गेली.

 

त्या काळात अमरावती शहरात ज्या नामवंत शाळा होत्या त्यामध्ये श्री गणेशदास राठी विद्यालयाचे नाव होते. आजच्या तुलनेत शाळांची संख्या बरीच कमीच

होती. श्री वसंतराव डुडूल मन लावून इंग्रजी शिकवायचे .शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त वर्ग घ्यायचे.

 

 

मला आठवते आम्ही दहावीला असताना आमचे नाईट क्लास विद्यालयामध्ये होत होते. त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नव्हती. शिक्षकांना जो पगार मिळत होता त्या पगारातच ते शाळा सुटल्यावर व घरी जाऊन आल्यानंतर आम्हाला शिकवायचे.

 

मोर्शी रोडवरील आमचे हे राठी विद्यालय हे व्ही आकाराचे आहे .दोन्ही बाजूला वर्ग .मध्ये सभागृह व ग्रंथालय. उजवीकडे मुख्याध्यापकाची रूम तर डावीकडे कार्यालय अशी आखणी केलेली.

 

 

आमच्या शाळेच्या परिसरात एक पिंपळाचे झाड होते. आजच्यासारखे शाळेच्या बाहेर बसणारे विक्रेते तेव्हा नव्हते. फक्त एक झंवर नावाचे चिवडा विकणारे किरकोळ शरीरयष्टी असणारे फक्त चिवडा विकायचे. त्यासाठी त्यांनी आपल्या सायकलच्या कॅरिअरला दोन्ही बाजूंनी दोन टिनाचे डबे बसविले होते. त्यात ते चिवडा भरून आणायचे. फक्त पाच पैशाला चिवडा मिळायचा. ज्यांची परिस्थिती चांगली होती ते मधल्या सुट्टीत चिवडा खायचे. आमच्या नशिबी मात्र तो योग्य नव्हता.

 

मधल्या सुट्टीत डबा मध्यान्ह भोजन नावाचा प्रकार नव्हता. आम्ही कोणीच डबा टिफिन आणीत नव्हतो .एक वेळा घरून जेवण करून आलो ते शाळा संपल्यानंतर घरी गेल्यानंतरच जेवत होतो.

 

आमच्या पि.टी.चे सर श्री गावंडे रामेकर व थोटे हे प्रामाणिकपणे आमची कवायत घ्यायचे. त्यांचा स्वभाव देखील चांगला होता. त्यामुळे नकळत आमचा व्यायाम होत होता. शाळेचे पटांगण खूपच मोठे होते. शाळेला येण्या जाण्यासाठी दोन मार्ग होते. एक मोर्शी रोडवरून होता .तर दुसरा रामपुरी कॅम्प कडून होता.

 

राठी विद्यालयात असताना भाषण देणे चांगले निबंध लिहिणे पिटीमध्ये भाग घेणे नाटकात भाग घेणे यामुळे आमचे व्यक्तिमत्व घडत गेले. तेव्हाचे सर्व शिक्षक मनापासून शिकवायचे .शिक्षा पण करायचे. जैन सर आम्हाला हिंदी शिकवायचे .दररोज एक पान हिंदी भाषेत शुद्धलेखन लिहून आणावे लागत होते. ते रोज तपासत होते .ज्याने आणले नाही त्याला शिक्षाही करायचे. शिक्षकांचा त्या काळात दरारा होता. आदरयुक्त भीती पण होती.

 

मी आठवी नववी दहावीत

असताना वर्गात कॅप्टन होतो. सर येईपर्यंत मुलांना सांभाळणे माझ्याकडे होते. इंग्रजीचा तास असला तर मी त्यांच्याकडून धडे वाचून घेत होतो. सर आले की मग मी थांबत होतो.

कुणी गडबड केली कोणी वाचनात चुका केली तर त्यांची नावे मी सरांना सांगत होतो. अर्थातच त्या मुलांना नंतर शिक्षा व्हायची. तीन वर्ष कॅप्टन राहिल्यामुळे मला नकळत नेतृत्व करण्याचे प्रशिक्षण मिळाले व ते पुढे माझ्या जीवनात कामात आले.

 

 

आमच्या सर्वांच्या लक्षात आहे ते हिरोळे सर. ते सामाजिक शास्त्र आम्हाला शिकवायचे. भूगोल नागरिकशास्त्र इतिहास. त्या काळात ते बाराही महिने कोट वापरायचे. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचे पटाईत होते. चुकला की ठोकला हा मंत्र त्यांना गवसला होता. इतर सर मात्र शिक्षा कमी जास्त करायचे. हिरोळे सरांचे लक्ष स्वतःच्या क्लास बरोबर इतरही वर्गावर असायचे. ते स्टाफ रूम मधून आमच्या वर्गापर्यंत येईपर्यंत इतर वर्गात जर त्यांना गडबड दिसली तर ती ते शांत करायचे .प्रसंगी शिक्षाही करायचे.

 

 

श्री गणेशदास राठी छात्रालय समितीच्या श्री गणेशदास राठी विद्यालयाने व तिथल्या शिक्षकांनी आम्हाला चांगले संस्कार दिले. मनापासून शिकविले.

 

आमच्या वेळेस शाळेमध्ये बुक बँक होती. गरीब मुलांना या बँकेतून विनामूल्य पुस्तके मिळत होती. मला ती दहावीपर्यंत मिळत राहिली. या शाळेने आम्हाला जीवनामध्ये उभे राहण्यासाठी आमचा पाया भक्कम पक्का केला. आमच्या जीवनाला शिस्त लावली. वर्गात जी शिस्त होती तीच कायम राहिली. सर्व विद्यार्थी शिस्तीत राहत होते शिस्तीत अभ्यास करीत होते शिस्तीतच एकमेकांशी बोलत होते.

 

आम्ही आता सेवानिवृत्त झालो आहेत. पण राठी विद्यालयातील माझे मित्र अजूनही कायम आहेत. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. जयप्रकाश खडसे शेती व व्यवसाय सांभाळणारे श्री उत्तम मुरादे व श्री एकनाथ मुरादे पाटबंधारे विभागातून निवृत्त झालेले श्री विजय डोंगरे रियल इस्टेटमध्ये स्वतःला गुंतवून घेतलेले श्री नामदेव एनकर होमिओपॅथीच्या डॉक्टर असलेले श्री मधुकर कविटकर लॉन्ड्रीचा व्यवसाय सांभाळणारे श्री मिठ्ठू पलिते गुजरात मधून सेवानिवृत्त झालेले श्री सुधाकर झोडापे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राहिलेले श्री रावसाहेब लंगोटे मुख्याध्यापकाकडे राहणारे श्री घनशाम राठी प्रा.राधेश्याम मुंदडा विनोद व छाया हरताळकर या सर्वांचे माझ्याकडे येणे जाणे आहे. मी अमरावतीला स्थायिक झाल्यामुळे माझे सर्वांशी आजही दृढ संबंध आहेत.

 

पुढे मी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यामुळे व तिथेच नोकरी मिळाल्यामुळे माझे राठी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री जगन्नाथ माहेश्वरी तसेच इतर अध्यापक वर्ग यांच्याशी दैनंदिन संबंध येत होता. आजही आम्ही एकत्र येतो तेव्हा शाळेचा विषय निघतो .तेव्हा खूप समाधान आम्हाला मिळते. आज आमच्या शाळेचा अमृत महोत्सव संपन्न होत आहे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे .

संचालक .

मिशन आयएएस. अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा