You are currently viewing कुडाळ हायस्कूल येथे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक मोफत कार्यशाळा

कुडाळ हायस्कूल येथे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक मोफत कार्यशाळा

कुडाळ

शालेय स्तरावर महत्त्वाची अशी विज्ञानावर आधारित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा सहावी व नववीकरिता लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात मराठी व इंग्रजी माध्यमातून राज्यस्तरीय मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येते. यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत, कास्यपदक, शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन शास्त्रज्ञांच्या हस्ते गौरवण्यात येते व डॉ. होमी भाभा रिसर्च सेंटर येथे दोन दिवस शिबिरात सहभाग घेता येतो. मुलांनी नुसते परीक्षार्थी न बनता खऱ्या अर्थाने विद्यार्थी बनावे, त्यांची प्रयोगशिलता, निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती, चौकसबुद्धी वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांनी सृजनशील व्हावे, त्यांची पर्यावरणाशी नाळ जुळावी ही या स्पर्धेचे उद्दिष्टे आहेत.

या परीक्षेचा अभ्यास कसा करावा? परीक्षेचे चार टप्पे कशा पद्धतीने असतात? ते का योजले आहेत? मुलांची निवड कशी केली जाते व कोणती पुस्तके वापरावीत. गेल्या ४१ वर्षात या स्पर्धेत यशस्वी झालेले बालवैज्ञानिक आत्ता काय करत आहेत? या परीक्षेची तयारी करीत असताना पालकांची भूमिका काय? प्रकल्प कसे सादर करावेत? आत्ता पर्यंत जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी सादर केलेले प्रकल्प यासंबंधी १८ जून २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ हायस्कूल येथे सहावी व नववीचे मराठी व इंग्रजी माध्यम विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी मोफत कार्यशाळेचे युरेका सायन्स सेंटरतर्फे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत गेली २० वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आतापर्यंत युरेकाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ७८ विद्यार्थ्यांची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. यात १० सुवर्णपदक, ५९ रजत व ९ काश्य पदक विजेते आहेत. विशेष म्हणजे गेली सतत ३ वर्षे सुवर्णपदकांचा सन्मान सिंधुदुर्गला मिळाला आहे. तरी कुडाळ, पणदूर ओरोस, सावंतवाडी व वेंगुर्ले परिसरातील सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हावासीयांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी सुषमा केणी (९२८४०३५३२६) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा