You are currently viewing पर्यावरण प्रेमी डॉ.मुकेश कुळकर्णी

पर्यावरण प्रेमी डॉ.मुकेश कुळकर्णी

 

भारत हा विविधतेने नटलेला देश! अनेक थोर महापुरुष संत महात्मे आपल्या देशाची महती वाढवून गेले. अनेक देशभक्त, थोर स्त्रिया, इथल्याच! भारत देश नवरत्नाची खाण असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. या सगळ्याला साथ निसर्गाची! आपला देश सूर्याचा देश !  लक्ख सूर्यप्रकाश, शीतल चांदण्यानी :नटलेले आकाश, नद्या डोंगर, झरे हिरवी हिरवी राने!  समृद्ध निसर्ग :कृत्रिमतेची लयलूटआणि स्वच्छ पर्यावरण हे आपलंवैभव!

पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली. निसर्गाचासमतोल ढासळू लागला पर्यावरण बिघडले काही निसर्गप्रेमी मंडळीनी, संतांनी  वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे या शब्दात आपल्याला जाणीव ही करून दिली. आजचे तरुणही या कामासाठी पुढे सरसावत आहेत ही आनंदाची बाब आहे.

अशाच एका पर्यावरण प्रेमी युवकाची ही यशोगाथा तुम्हालाही निसर्गावर प्रेम करायला नक्कीच उद्युक्त करेल! हा तरुण म्हणजे मूळ भुसावळचे असणारे डॉ मुकेश कुळकर्णी.

डॉ मुकेशचे वडील रेल्वेत !रेल्वेत पी.ओ.एच. विभागात होते.डॉ मुकेश हे  भावंडात सगळ्यात लहान! भाऊ व बहीण दोघेही मोठे साहजिकच घरात लहान म्हणून लाड कौतुक खूप झाले. वडील सरकारी नोकरीत! पाच जणांचे हे कुटूंब खूप समाधानी वृत्तीचे! आई वडिलांचे खूप चांगले संस्कार मिळाले! गरिबी नसली तरी काटकसरीने  व आनंदात  राहायला  शिकले.छोट्या मुकेशची बुद्धी खूप चौकस होती. भुसावळ तसे निसर्गाच्या सानिध्यात असलेले! मोठे रेल्वे जंक्शन! जवळच रावेरचे घनदाट जंगल’ झुळझुळणारी तापी नदी , तरीही भुसावळ इतके गरम का हा प्रश्न मुकेशच्या बालबुद्धीला पडत असे. B.sc पर्यंत त्यांचे शिक्षण भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतांना NSS म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग व त्यातील विविध उपक्रम यामुळे मुळात त्यांना पर्यावरण, निसर्ग याविषयी खुप आस्था व आवड निर्माण झाली. त्यामुळे जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात M.Sc नंतर डॉ. थोरात सर  यांनी मुकेशच्या आवडीला प्रोत्साहन देत PhD साठी मार्गदर्शन केले. उत्तर महाराष्ट विद्यापीठात PHD ला त्यांनी पर्यावरण हाच विषय घेतला.   आवड जिद्द, मेहनत करण्याची तयारी यामुळे  त्यांना पर्यावरण विषयात डॉक्टरेट ची  पदवी मिळाली. इतक्या लहान वयात डॉक्टरेट मिळविणे खरंच कौतुकास्पद! तसेच या उच्च शिक्षणासाठी त्यांचे मोठे भाऊ महेश कुळकर्णी व बहीण सुनीता कुळकर्णी (आताची उपासानी) यांचे मार्गदर्शन व सहकार्य अतिशय महत्वाचे होते.

आता सगळा निसर्ग, पर्यावरण त्यांना दोन्ही हात पसरून बोलावत होते. साद देत होते. सुरुवातीला पर्यटन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने MTDC च्या बेड अँड ब्रेकफास्ट, महाभ्रमण व ऍग्रो टूरिजम सोबत शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी त्यांना मिळाली आणि 2015-16 ला तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी साठी सन्मान सुद्धा मिळाला.त्यामुळे पर्यावरण व पर्यटन यांची सांगड घालत किशोरी गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनामार्फत ‘महापर्यटन – पर्यटनातून रोजगाराच्या संधी’ या 13 भागांच्या विशेष मालिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पर्यटन व त्यातील संधी याबाबतची माहिती घराघरात पोहचली. आज महाराष्ट्रात आणि विशेष करून कोकणात निवास व न्याहारी योजना घराघरात राबविली जात आहे. ज्यामुळे तेथील तरुणांचं नोकरीच्या शोधात असणार स्थलांतर तर थांबलंच ,पण स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यातच MTDC च्या महत्वाच्या Omotenashi या जपान सरकार सोबतच्या उपक्रमा अंतर्गत डॉ मुकेश याची 8 दिवस जपान मध्ये प्रशिक्षणा साठी निवड झाली होती आणि MTDC चे श्री चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

सध्या चार वर्षांपासून ते हिलदारी या घन व प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या अभियानात महाबळेश्वर चे काम बघत आहेत.  त्यांच्या पर्यावरण प्रेमाची ही पावतीच आहे महाबळेश्वर व आसपासच्या पंचक्रोशीत प्लास्टिक निर्मूलन करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आपल्याला नेहमीच पाहायला मिळते की मनुष्य जिथे जाईल, तिथला निसर्गाचा समतोल बिघडलाच समजा !  जिथे जाईल तिथे कचरा करून प्लास्टिक तिथेच टाकून तो पुढे निघतो. याला प्रतिबंध घालून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे व महाबळेश्वर ला देशातील सर्वात स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवण्याचे डॉ मुकेश चे स्वप्न आहे व त्या दृष्टीने त्यांचे सतत अथक प्रयत्न सुरू आहेत. या ध्येयवेड्या तरुणाला साथ आहे सुंदर समंजस  सुशिक्षित पत्नी.. अंकिता ची  ! त्यांचे सांसारिक जीवनही अतिशय मधुर आहे. सहा वर्षांचा निनाद व लहानश्या साईशाच्या बाललीला! असे हे सुखी चौकोनी कुटुंब महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात पाचगणी येथे राहत आहेत आईवडिलांचे आशीर्वाद आहेतच! तसेच डॉ मुकेशवर श्री अनिरुद्ध बापूंचा वरदहस्त आहे व जीवनात इतके सुख आनंद सगळे बापूंच्या आशीर्वादामुळेच! अशी त्यांची नितांत श्रद्धा आहे! एका कवीने म्हटल्याप्रमाणे

*जीनेको और क्या चाहीये?*

अस समाधानी जीवन आहे डॉ. मुकेशचे!

डॉ मुकेशशी बोलतांना मला हे जाणवले की ते अतिशय नम्र विनयशील आहेत स्वकर्तृत्वावर एव्हडी मोठी झेप घेतलेल्या डॉ मुकेशचे माणूसपण अनुभवून मला खुप आनंद झाला त्यांचे कौतुक वाटले अहंपणा,किंवा गर्व यत्किंचितही नसलेल्या डॉक्टरांनी पाचगणीला येण्याचे प्रेमळ निमंत्रण दिले, लिहिण्यासाठी मला पूर्णपणे मदत केली त्याबद्दलही त्यांचे मनापासून अभिनंदन!

डॉ मुकेश कुलकर्णीचा ३ मेला वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा !त्यांच्या मनातली सर्व स्वप्ने पूर्ण होवोत   स्वच्छ सुंदर भारताचे त्यांचे स्वप्न त्यांच्या  प्रयत्नाने नक्कीच प्रत्यक्षात उतरेल ही खात्री आहे.

डॉ मुकेश वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा!

तुम जियो हजारो साल सालके दिन हो पचास हजार!

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा