You are currently viewing माणसं अशीही असतात!

माणसं अशीही असतात!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*अभिनेता भुषण कडू याच्या आयुष्यातील एक शोकांतिका* 

*(माणसं अशीही असतात!)*

***************************

मी काही दिवसांपूर्वी फेसबुक वर अभिनेता भुषण कडू याने त्याच्या आयुष्यात घडलेली एक शोकांतिका कथन केलेला व्हिडिओ पाहीला. त्याच्या अडचणीच्या काळात बिकट परिस्थितीत आलेले वाईट अनुभव त्याने सांगीतले.त्याच्यावर आलेल्या संकटांचा,व्यथा,वेदनेचा प्रपंच मांडला आणि त्याने केलेल्या संभाषणातून कळले की यशाच्या,प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला एक हरहुन्नरी संवेदनशील कलाकार जेव्हा रस्त्यावर येतो,त्याचं करियर नकळतपणे संपतं तेव्हा खऱ्यार्थाने आयुष्य काय असतं आयुष्यात सोबत असणारी माणसं काशी असतात ते समजल.कोवीडच्या काळात तर अनेकांनावर उपासमारीची वेळ आली होती.अनेकांचे हात थांबले,चुली थंडावल्यात प्रत्येक क्षेत्रातील लोकांवर उपासमारीची वेळ आली.खूप संकट त्यावेळी अनेकांच्या माथ्यावर होती त्यातून भूषण कडू ही सुटला नाही‌. काम बंद हातात पैसा नाही.सगळं काही छान चालत असताना अचानक करोनामधे एक छोटस मुलं सोडून भुषण कडू ची बायको ‘कादंबरी’चे निधन झाले आणि भूषणवर तर आभाळच कोसळले. एक हसता खेळता संसार असा अर्ध्यावर सोडून जाईल याच विचार भूषण कडूच्या मनात कधी आला ही नसेल पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि ते घडून गेलं.त्या नंतर भूषण कडू वर इतकी बिकट परिस्थिती आली की वडापाव खायला सुध्दा त्याच्या खिशात पैसे नव्हते त्यावेळी. जी काही जमापुंजी होती ती ही संपत आली होती.मरणाचा विचार त्या वेळी डोक्यात येत होते उधार उसनवारी करून कसेतरी पोटातील भुक शांत करावी लागत होती उद्या पोटाला काही मिळेल की नाही याची चिंता लागुन होती.काम बंद झालं पण पोराला उपाशी ठेवता येत नव्हतं.आहे त्या परिस्थितीला समजून घेऊन भूषण कडू लढत होता.काम मिळत नव्हते काहीजण तर अक्षरशःसेट वरून त्याला हाकलून लावत होते.डोक्यात नको ते विचार घोळायचे.म्हणजे जगण्याचा आणि जगवण्याचा आधारच गेला म्हटल्यावर स्वतःची सावली सुध्दा परकी वाटायला लागते. माणसाच्या आयुष्यातून जर बायको वजा झाली ना तर आधाराला कोणाचाच हात पुढे येत नाही.कोणी कितीही आपलं असलं तरी बायको शिवाय पाठराखण कोणीच करुशकत नाही.तिने ‘मी आहे ना’ एव्हढी जरी म्हटले तरी जगण्याची उमेद वाढते.पोट फार वाईट असते हो पोटाला जगविण्यासाठी हातात पैसा हवा असतो.तो नसेल तर आपलेही परके होतात.हे जग पैशाकडे बघून चालणारं आहे.ज्याच्या जवळ पैसा त्याचाच उदोउदो करतील.ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे बघणार ही नाही मग तो व्यक्ती सुप्रसिद्ध असो अथवा नसो माणसं किती गुणवान आहे हे नाही बघतं तो किती धनवान आहे हे पाहिले जाते.पैशाशिवाय जगणं नाही,दुनिया नाही.डोक्यावर कर्ज हातात,काम नाही,जेवणासाठी खिशात पैसे नव्हते अशी वाईट अवस्था असतानाही भूषण कडूला मुलांसाठी जगायचं होतं पण जगण्यासाठी साधन नव्हतं. ज्यांच्या कडून पैसे घेतलेत ते सेटवर येऊन धमकी देत होते.ज्यांच्या कडे काम मागायला जायचा तर ते अपमान करून परत पाठवायचे.डोक्यावर कर्ज झालं म्हणून स्वतःच घर विकाव लागलं. अडचणीच्या काळात कोणीच साथ दिली नाही जे जवळ होते ते दुर गेलेत.सर्व सोबतची माणसं आपोआप दुर झालीत.आजुबाजूला माणसांची गर्दी होती पण त्या गर्दीत भुषण कडू एकटाच राहीला.सोबतची साथ संगत सुटली आणि खाली हात रिकामे पोट अशी अवस्था भुषण कडू वर आली. म्हणजे माणूस कितीही मोठा असला नसला तरी आचानक आलेल्या संकटात सोबत कोणीच नसतो.खरतर अशा वेळेस खऱ्याअर्थाने माणसाला आधाराची गरज असते.पण करोनात बायको गेली आणि सारी हतबलता अवतीभवती फिरायला लागली.कायम सोबत असणारी आपली माणसं जेव्हा परिस्थिती पाहून हळुहळू दुर होतात ना ! तेव्हा हताश होतो माणूस जेव्हा कोणी साध विचारायला सुध्दा येत नाही त्यावेळेस.एरव्ही गळ्यात गळे घालून फिरणारी माणसं अडचणीच्या वेळी सोबत नसतात त्यावेळेस कुठेतरी काहीतरी चुक केल्या सारखे वाटते.अरै ही माणसं अशी वागूशकता ? याच आश्चर्य वाटतं.म्हणजे जे भुषण कडूच्या बाबतीत घडले ते आपल्या बाबतीतही घडत असतं की.असा बाका प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हाना केंव्हातरी येतच असतो.अशा बिकट प्रसंगाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते.पण जेव्हा कोणी नसतं त्यावेळी परमेश्वर असतोचं हे विसरून चालणार नाही.सार काही परमेश्वर बघत असतो.मग एक अशा वळणावर माणसाच्या वेषात मदतीला देवच धाऊन येतो.आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात घोळत असतानाही अचानक एक स्वामी समर्थ भक्त भुषण कडूला भेटतो आणि महाराजांचा उपदेश देऊन जगण्याची नवी दिशा नविन उमेद देतो.भक्ती मार्ग स्विकारल्यानंतर भूषण कडूच्या आयुष्याला नवीन सुरुवात होते.आणि मग पुन्हा गाडी पुर्वरत मार्गाला लागते.

‌खरं तर मराठी चित्रपट सृष्टीत असे काही दिग्गज कलाकार आहे की दहा पिढ्या पुरेल एव्हढ त्यांनी कमावून ठेवलंय.अडचणीच्या काळात व्यथा वेदना समजून माणूसकी या नात्याने थोडी जरी मदत केली असती तरी भुषण कडू स्थिरस्थावर राहिला असता पण काय असतं दुःख हे स्वतःच असतं ते स्वतःलाच पेलावे लागत दुसऱ्याला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नसतं फारतर सहानुभूती तेव्हढी मिळते.पण काही जरी झालं तरी कुणाची मदत न घेता स्वबळावर पुन्हा गेलेलं वैभव परत मिळवण्याची जिद्द ठेवणारी अशी भुषण कडू सारखी माणसं फार कमी असतात.आणि जेव्हा भुषण कडू सारख्या माणसावर असा प्रसंग येतो तेव्हा कळतं माणस अशीही असतात की जे दुःख सहन करतात आणि माणसं तशीही असतात की जे दुःख समजून घेत नसतात.

खरं पाहता कलाकार हा एक माणूस असतो.जेव्हा त्याला मंचावर किंवा कॅमेरा समोर यायचं असतं तेव्हा त्याला त्यांच्यातला माणूस हा पडद्या मागे ठेवायचा असतो.त्याच्या अडचणींना एका पोतडीत बांधून कलाकार म्हणून मंचावर किंवा सेटवर यावं लागतं. कारण त्याला मिळालेल्या भूमिकेत त्याला त्यावेळी एकरूप व्हायचं असतं.मनात खूप काही साचलेल असतानाही त्या पात्रात एकरूप व्हावे लागतं.कलाकार सुध्दा एक माणूसच असतो त्यालाही मन आहे भावना आहेत सुख दुःख व्यथा वेदना त्याला ही असतात.पण त्या कलाकारांच्या वेदना कोणी समजू घेत नाही त्यांच्या दुख:शी प्रेक्षकांना काही घेणं नसतं कलाकाराला फक्त हसवायचं असतं. हसवण्याचं काम करायचं असतं हसता हसता प्रेक्षक मन मोकळे होतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते.पण हसवणाऱ्या कलाकाराच कायं!.हा प्रश्न कोणालाही पडतं नाही.नाट्य,चित्रपटाच्या सिरीयल च्या माध्यमातून त्या अभिनेत्याला काहीतरी सांगायचं असतं.पण त्या मेकअप केलेल्या चेहऱ्यामागे किती दुःख असतं हे माणूस म्हणून एकाही प्रेक्षकाला समजत नाही. माणसाचा मुखवटा उतरवून जेव्हा अभिनेत्याचा मुखवटा चढतो तेव्हा त्याला फक्त अभिनयच करायचा असतो. मिळालेली भूमिका प्रामाणिकपणे सादर करायची असते.पण त्यावेळी

त्या मेकअप केलेल्या मूखवट्यावर स्वतःच दुखःयेणार नाही याची काळजी कलाकार म्हणून त्या माणसाला घ्यावी लागते.मनामध्ये कितीही वेदना असतील अडचणी असतील समस्या असतील घरात कोणी आजारी असेल ते सर्व बाजूला ठेऊन मंचावर किंवा कॅमेरा समोर दिग्दर्शकाने दिलेल्या भूमीकेत एकरूप होऊन त्या भूमिकेला कसा न्याय देता येईल एव्हढाच विचार त्या कलाकाराच्या डोक्यात असतो.त्या वेळी स्वतःच्या दुःखाचा विचार करता येत नाही.जेव्हा खोट्या रूपातून खऱ्या रूपात आल्यानंतर,चेहऱ्यावरचा मेकअप उतरल्यावर माणसाच्या भूमिकेत तो कलाकार येतो तेव्हा पुंन्हा त्याची दु:ख त्यांच्या डोळ्यासमोर तरंगत असतात.कलाकाराला त्यांच्या भावना कोणाकडेही व्यक्त करता येत नाही. मन मोकळे करता येत नाही.जे पडद्यावर दिसत तसं नसतं.पण कलाकाराच्या आतला दुखावलेला माणूस बघण्याची कोणी तसदी घेत नाही.एक तासांची सिरीयल किंवा तिन तासाचा चित्रपटाच पाहून त्या कलाकारच खरं आयुष्य समजत नसतं.त्यासाठी माणूस म्हणून त्या कलाकारांच्या आत डोकावुन पाहील तर त्याच्यात खूप वेदना दिसतील यातना दिसतील.पण काय सेलिब्रिटी म्हणून आपण त्यांच्या कडे बघतो फोटो काढतो.यापेक्षा प्रेक्षक या नात्याने आणखी काय करतील. कलाकारा़चं दुःख समजून घ्यायला कोणाला वेळ आहे? कलाकाराने केलेलं मनोरंजन हेच वास्तविक आहे असं समजून त्या कलाकारांच्या दुःखांचा,घरातल्या अडचणीचा विचार होत नाही.कलाकार आजारी जरी असला तरी त्याला पोटासाठी काम करावं लागतं. एखाद्या भूमीकेत शिरल्यावर त्याचे दुःख,त्याच्या समस्या बाहेर विंगेत सोडून यावी लागतात. कॅमेरा मागे काळोख असतो त्या काळोखात दुःख ठेवायची असतात चेहऱ्यावर मुखवटा चढवला की कलाकार नावाच्या माणसाला त्याच माणूसपण विसरून दिग्दर्शकाने दिलेल्या भूमिकेत एकरुप होवून प्रेक्षकांच्या दुःखाच निरसन करायचे असते.एखादा विनोद सादर करून त्या प्रेक्षकांच्या दुःखावर भावनीक फुंकर घालावी लागतो.प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसु हेच कलाकाराच्या भूमिकेच समाधान असतं म्हणून कलाकाराला स्वतःची दुःख विसरावी लागतात.आतून तो कलाकार किती रडत असतो हे फक्त त्यालाच कळतं. मग जेव्हा तो एक्झिट घेतो तेव्हा त्याच्या डोक्यात विचार येतो की आपल्या आयुष्यात असाच अंधार असणार आहे का.पण त्या अंधारातल्या कलाकाराकडे कोण बघतं!त्या कलाकाराला तर लाईट’ कॅमेरा,साऊंड,एक्शन म्हणताच पोटाची भुक भागवण्यासाठी स्वत:चं दुःख,आनंद,हाश्य विसरून फक्त तिन तासाचा शे सादर करायचा असतो. म्हणजे प्रेक्षक मायबापाच्या चेहऱ्यावर खरं खरं हसु आणण्यासाठी त्या कलाकाराला खोटं खोटं हसावं लागतं या पेक्षा दुःखद शोकांतिका दुसरी नाही.खरचं एका अभिनेत्याचं आयुष्य फक्त तिन तासाच असतं.त्या तिन तासात त्याच्यातला माणूस कुठेच नसतो.कलाकार स्वतः वर कमी आणि त्याच्या कलेवर खूप प्रेम करत असतो.कारण कला,अभिनय,मंच, कॅमेरा त्याला जगवत असते.कला त्याच्या जगण्याचं साधन आहे म्हणून तो कलेशी प्रामाणिक रहातो.कलाकार हा सर्वांसाठी असतो.पण त्यासाठी कोण?जरा गंभीर प्रश्न आहे. सेलेब्रिटी म्हणून वेगवेगळ्या इव्हेंट साठी त्याला बोलावण्यात येतं.पण कार्यक्रम संपल्यावर जेव्हा माणूस म्हणून तो त्याच्या घरी जातो तेव्हा अनेक अडचणी दुःख समस्या त्याच्या अवतीभोवती रेंगाळत असतात आयुष्याच्या प्रवासात सुख दुःखाच्या एक एक गाठी सोडवताना प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो तेव्हा त्याला सार काही बाजूला ठेऊन.कॅमेरा समोर मुखवटा चढवून फक्त प्रेक्षकांचा विचार करावा लागतो.कारण प्रेक्षक हेच त्या कलाकाराचे मायबाप रसीक असतात. म्हणून ‘शे मस्ट गो ऑन’ शिवाय एका कलाकाराला पर्याय नसतो कारणं त्याला जगायचं असतं.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा