मंदिर, शाळा बंद…

मंदिर, शाळा बंद…

धर्मादाय आयुक्त संस्था ओरोस यांच्या लायसन्सच्या आधारे गर्दी होणारे रमी क्लब मात्र सुरू…

देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गेले कित्येक महिने अनेक आस्थापनांवर सरकारकडून बंदी आणण्यात आली. कित्येक उद्योगधंदे बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जिल्ह्यात मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने झाली, सरकारने मदिरालये सुरू केली. परंतु कोणीही राजकारण्यांनी मंदिरे बंद करण्यासाठी किंवा बेरोजगार झालेल्या लोकांसाठी आंदोलने केली नाहीत किंवा लाखो लोक बेरोजगार होऊनही सरकारने बेरोजगारी हटविण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गर्दीच्या कारणांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मंदिरे, शाळा बंद आहेत. परंतु रमी या पत्त्यांच्या खेळाच्या नावावर गर्दी करून सुरू असलेल्या क्लबला परवानगी कशी काय देण्यात येते?
धर्मादाय आयुक्त संस्था ओरोस यांच्या जुन्या लायसन्स च्या आधारे जिल्ह्यात सुरू असलेल्या क्लब कडे प्रशासनाचा दुर्लक्ष का होतो? पत्ते खेळणाऱ्या या क्लब मध्ये होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा फैलाव होत नाही का? कणकवलीत सुरू असलेल्या क्लबमध्ये मुंबई अधिनियमानुसार प्लेन रमी खेळली पाहिजे. क्लबमध्ये कॅमेरा लावणे बंधनकारक आहे. कणकवली येथील क्लबमध्ये कॅमेरा लावलेले आहेत. परंतु प्लेन रमी ऐवजी सौदाबाजी घेतली जाते. नियमांना पायदळी तुडवून जुगार खेळला जातो. कॅमेरा लावलेले असूनही त्याची चाचपणी होत नाही, पोलिसांकडून या क्लबकडे दुर्लक्ष केला जातो.
राज्यात मंदिरे, शाळा बंद आहेत. कोरोनामुळे बऱ्याच आस्थापनांवर निर्बंध अजून शिथिल केले नाहीत. परंतु कणकवलीत मात्र धर्मादाय आयुक्त संस्था, ओरोसच्या नावावर क्लब मात्र बिनधास्तपणे सुरू आहेत. अशाप्रकारे सुरू असणाऱ्या क्लबमधून दिवसाला दोन लाखांच्यावर उलाढाल होत असते. त्यात असणाऱ्या आर्थिक हितसंबंधांमुळे प्रशासनाचा नियमांकडे दुर्लक्ष होतो. जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहेत, लवकरच सर्व शाळा, मंदिरे सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, परंतु कोणतीही काळजी न घेता गर्दी करून खेळले जाणारे क्लब सुरू असल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या क्लबचे आणखी एक आश्चर्य म्हणजे हे क्लब सुरू करताना मात्र पुण्यकार्य केल्याप्रमाणे विधिवत पूजा करूनच सुरू केले जातात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अशा क्लबकडे प्रशासन तिसरा डोळा उघडून बघणार आहे की आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी डोळे असूनही मिटून घेणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा