You are currently viewing संविधान समता दिंडीत अनुभव शिक्षा केंद्राचे साथींनी अनुभवली समतेची वारी

संविधान समता दिंडीत अनुभव शिक्षा केंद्राचे साथींनी अनुभवली समतेची वारी

पुणे / प्रतिनिधी :

समता भुमी महात्मा फुले वाडा,पुणे येथून संविधान समता दिंडी प्रस्थान सोहळा ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज म्हणाले, संविधानातील मुल्ये, कलमे संतांच्या भाषेत म्हणजेच सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न व्हावेत. ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व ओव्या आणि अभंगातून समजावून देत संविधानामुळेच सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळत असल्याचे सांगितले.

सुभाष वारे यांनी “कोणाही जीवाचा न घडो मत्सर,वर्म सर्वेश्वर पुजनाचे”या अभंगाचा दाखला देत कोणतेही एका समाजाला लक्ष्य करून त्या समाजाविरुद्ध व्देष पसरवणे हे संत विचारांमध्ये बसत नसल्याचे म्हणाले.

काफिर म्हणजे काय हे समजावून सांगताना पैगंबर शेख म्हणाले की, सर्वांनी स्विकारलेला विचार जो मानत नाही तो काफिर असतो.त्यामुळे जो आजच्या काळात संविधान मानत नाही. तो काफिर समजावा. तसेच यावेळी काॅग्रेसचे नेते अभय छाजेड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, वर्षा देशपांडे यांनी संत विचारांची व्यापकता मांडत संविधान समता दिंडीला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुभव शिक्षा केंद्राच्या सरस्वती शिंदे यांनी केले. भूमिका राज वैभव यांनी मांडली तर आभार प्रदर्शन साधना शिंदे यांनी केले. काही समविचारी संस्था संघटनेच्या पुढाकाराने या संविधान समता दिंडीचे आयोजन करण्यात येते. या वर्षी हे पाचवे वर्ष आहे.

दिनांक 14 व 15 या दोन दिवस या वारीत अनुभव शिक्षा केंद्रामार्फत नाशिक, सातारा, लातूर, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, सिंधुदुर्ग, वाशीम, भंडारा, अकोला, वर्धा अशा विविध जिल्हातील 30 युवकांनी या संविधान समता दिंडीत सहभाग घेतला. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव साथींनी संतविचारांची समतेची वारी अनुभवली. संविधानिक मुल्ये व संतविचार यांचे पोस्टर घेऊन हे साथी प्रबोधनाची गाणी म्हणत सहभागी झाले. वारकऱ्यांशी संवाद करत संतांचे विचार व संविधानातील मूल्य यातील साम्य सांगत, शाम सुंदर सोन्नर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना संतविचारांचा संविधानावर असणारा प्रभाव सांगत वारी समतेचा विचार पेरणारी, विषमता दूर करणारी व सर्वाना सामावून घेणारी आहे. तसेच संविधान सुद्धा विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्यासाठी आहे. त्यामुळे आपण संविधान समजून घ्यावे व संविधानातील मूल्ये आपल्या रोजच्या जगण्याचा भाग व्हावे असे पथनाट्य च्या माध्यमातून सांगण्यात आले. संविधान समता दिंडी कशासाठी हे सांगणारे पञक देत पहिला दिवस पुणे ते लोणी काळभोर आणि दूसरा दिवस यवतपर्यंत पूर्ण केला. साथी सरस्वती शिंदे व दिपक देवरे आणि अनुभव शिक्षा केंद्राच्या जिल्हा प्रशिक्षकांनी या संविधान समता दिंडी मधील युवकांच्या सहभागासाठी परिश्रम घेतले. तर सचिन नाचणेकर यांनी या सर्व प्रक्रियेत मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम घेऊन संविधान समता दिंडीत अनुभवच्या वतीने युवकांचा सहभाग नोंदवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा