You are currently viewing अवैद्य दारू व्यवसाय विरोधात संपादक सीताराम गावडे यांची भूमिका कौतुकास्पद

अवैद्य दारू व्यवसाय विरोधात संपादक सीताराम गावडे यांची भूमिका कौतुकास्पद

संपादकीय……

गोवा बनावटीच्या अवैद्य दारूचा धंदा सिंधुदुर्गात मोठ्या जोशात सुरू आहे. कित्येकदा यावर संवाद मीडियाने देखील प्रकाशझोत टाकलेला होता. परंतु लाच खाऊन कुंभकर्णाला सुद्धा लाजवेल अशी झोप घेतलेले राज्य उत्पादन शुल्कचे जिल्ह्यातील अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन सुस्त पडले होते. सरकारने दारूची अवैद्य वाहतूक व विक्री वर बंदी आणण्यासाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क खात्यावर जबाबदारी दिली आहे. परंतु मिळालेल्या जबाबदारी मुळे स्वतःचे कर्तव्य विसरून दारूच्या अवैद्य व्यापारातून मिळणाऱ्या चिरीमिरीवरच जास्त लक्ष केंद्रित केलेले हे अधिकारी दारू तस्करांच्या सारखेच गब्बर झालेत. हायफाय गाड्या, बंगले, जमिनी घेऊन माजले आहेत. त्यांच्या विरुद्ध कितीही तक्रारी केल्या तरी पैशांच्या जोरावर ते त्यातून मार्ग काढतात. त्यामुळे दारूचा अवैध्य व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दारूच्या अवैद्य व्यवसायातून मिळणाऱ्या सहज पैशांमुळे अनेक तरुण अनैतिक व्यवसायाकडे, नशेबाजीकडे वळले आहेत. तरुणाई विनाशाकडे मार्गक्रमण करत आहे.
गोव्यातून करमुक्त अवैद्य दारूची सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रात इतरत्रही वाहतूक विक्री होत आहे, त्यासाठी दारू तस्करांचे मोठे रॅकेट कार्यरत असून त्यांना संपूर्ण सहकार्य करते ते जिल्हा राज्य उत्पादन शुल्क खाते. आळी मिळी गुप चिळी सारखे सुरू असलेले हे प्रकार लोकांच्या दृष्टीने महत्वाचे नसतात, परंतु बिघडत चाललेली तरुण पिढी आणि दारूच्या अवैद्य व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांमुळे वाढत चाललेली तरुणाईची दादागिरी आणि अनैतिक कृत्ये भविष्यात नक्कीच सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे देखील मुश्किल करणारी आहेत. गोव्यातील दारू महाराष्ट्रात आणून त्यात भेसळ करून दारूच्या बाटल्यांची लेबल, बुच बदलून काही परमिट रूम मधूनही सर्रास विक्री केली जाते. अनेकांनी पोटापाण्यासाठी दारूच्या अवैध्य व्यवसायाची निवड केली आहे, हफ्ता दिला की व्यवसाय निर्धास्तपणे करता येतो, आणि त्यातून बक्कळ पैसाही मिळतो. त्यामुळे अनेक दारू तस्कर आज गर्भश्रीमंत झालेत. एखादी गाडी केस दाखवायला म्हणून पकडली तरी कित्येकवर्षं ती उत्पादन शुल्क खात्याच्या गोडावून मध्ये पडून राहते, तोपर्यंत हेच दारू तस्कर त्यातलीच दारू अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने विकत घेऊन पुन्हा त्याचा व्यवसाय करतात. नष्ट केलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या घेऊन भेसळयुक्त दारू भरून विक्री करतात. असे अनेक उद्योग दारू तस्करांचे चालतात. मात्र उच्च पातळीवरून त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केला जातो, कारण त्यातील मलई वरपर्यंत पोचत असते.
कोंकण लाईव्ह चे संपादक सिताराम गावडे यांनी राज्य उत्पादन शुल्कचे मुख्य अधिकारी कांतीलाल उमाप यांच्याशी संपर्क साधता गोव्यातून महाराष्ट्राकडे वाहतूक होणारी अवैद्य दारू पकडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत गेल्या काही दिवसात वरिष्ठांच्या आदेशानंतर जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जाग आली आणि अनेक गाड्या पकडल्या जाऊ लागल्या. सिताराम गावडे यांच्या म्हणण्यानुसार गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या फक्त गाड्या पकडून गोव्यातील अवैद्य दारू बंद होणार नाही तर, महाराष्ट्रातील, सिंधुदुर्गातील दारू तस्करांना गोव्यातील जे व्यावसायिक दारू पुरवठा करतात त्यांची माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडविला म्हणून महाराष्ट्र सरकारने त्या व्यावसायिकांवर कारवाई केली पाहिजे, तरच महाराष्ट्रात अवैद्यरित्या येणारी दारू मोठ्या प्रमाणावर बंद होईल, आणि अवैद्य दारूच्या तस्करीला आळा बसेल.
गोव्याच्या अवैद्य दारूच्या व्यवसायातून मिळालेल्या बक्कळ पैशांची मस्ती आंबोली येथील घाटात फेकून दिलेल्या महिलेचा मृतदेह होती. अवैद्य रित्या मिळालेल्या पैशांमुळेच १६/१७ वर्षांची मुले आपल्या आई, आजीच्या वयाच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत करायला जातात आणि त्यातूनच कोलगाव जंगलात घडला तसा घृणास्पद प्रकार घडतो, आणि ऐन तारुण्यात पाय सुद्धा न ठेवलेली पिढी विनाशाकडे जाते आहे. या सर्व गोष्टींना आळा घालायचा असेल तर गोव्यातून होणारी अवैद्य दारू वाहतूक, विक्री पुर्णपणे बंद झाली पाहिजे. आणि या अवैध्य दारू व्यवसायाला आळा घालण्याची जबाबदारी असलेलं उत्पादन शुल्क खात्याने देखील प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. या उत्पादन शुल्क खात्याच्या मुजोर अधिकाऱ्यांना झोपेचे सोंग घेतलेले जागे करण्यासाठीच कोंकण लाईव्ह चे संपादक सिताराम गावडे यांनी घेतलेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे.
जिल्ह्यातून अवैद्य धंद्यांना आळा घालायचा असेल आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर वचक ठेवायचा असेल तर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांनी, लोकप्रतिनिधींनी अवैद्य धंद्यांच्या विरोधात मोहीम उघडणाऱ्या सिताराम गावडेंसारख्या व्यक्तींच्या मागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, तरच अशा व्यक्ती निर्भिडपणे आपले काम करून अवैद्य धंद्यांच्या तस्करांना आणि राज्य उत्पादन शुल्क च्या लाचखोर अधिकाऱ्यांना आपल्या लेखणीतून धडा शिकवू शकतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + four =