You are currently viewing मडुऱ्यात भरवस्तीत बिबट्याचा गोठ्यात येऊन गायीवर हल्ला

मडुऱ्यात भरवस्तीत बिबट्याचा गोठ्यात येऊन गायीवर हल्ला

बांदा

मडुरा डीगवाडी येथील शेतकरी नाना वेंगुर्लेकर यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने गायीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात बिबट्याने गायीच्या तोंडावर ओरबाडले आहे. ग्रामस्थ बाबू वेंगुर्लेकर यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच बिबट्याला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र बिबट्याचा धोका कायम आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मडुरा डीगवाडी येथे शेतकरी नाना वेंगुर्लेकर यांचा घरालगतच गोठा आहे. रात्री ८.३० च्या सुमारास बिबट्या भरवस्तीमधील गोठ्यात घुसला. त्यामुळे गाय मोठमोठयाने हंबरु लागली. गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ बाबू वेंगुर्लेकर गोठ्यापाशी गेले. बिबट्या गायीवर हल्ला करीत असल्याचे पाहिले. त्यांनी प्रसंगावधान दाखवित धैर्याने बिबट्याला हुसकावून लावले.

वाडीत याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली. माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर यांनी बांदा पोलीस व वनविभागाला या हल्ल्याची माहिती दिली. वनरक्षक आप्पासो राठोड रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

तांबळघाटी परिसरात वहनचालकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होते. मात्र आता बिबट्या थेट वस्तीत घुसल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे. बिबट्याचा धोका कायम आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − five =