You are currently viewing दोडामार्ग खून प्रकरणातील पुरावे पोलीसांच्या हाती

दोडामार्ग खून प्रकरणातील पुरावे पोलीसांच्या हाती

पूर्वनियोजित कट करुन महिलेचा खून केल्याचे उघड

दोडामार्ग (प्रतिनिधी)

पाळ्ये – घोटगेवाडी येथे पत्नीचा निर्घृण खून करून मृतदेह मोरीत टाकल्यानंतर तिला ओढण्यासाठी वापरलेली दोरी पोलीसांनी ताब्यात घेतली. मृतदेह फेकलेल्या ठिकाणाहून साधारण दोन किलोमीटर अंतरावर तिलारी कालव्यात फेकून दिली होती. तसेच पत्नीचा मोबाईल मृतदेहा पासून काही अंतरावर झाडीत लपविला होता. पती व त्याचा साथीदार यांच्याकडून ही माहिती घेऊन दोरी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. अजून काही पुरावे हाती लागण्याच्या दिशेने दोडामार्ग पोलिसांचा तपास चालू आहे.

घोटगेवाडी भटवाडी येथे कॉजवेच्या खाली चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. दोडामार्ग पोलिसांनी पाच तासातच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी गोवा म्हापसा येथून जेरबंद केलेले विनोद मनोहर नाईक व ऋतुराज श्रावण इंगवले यांना पोलीसी हिसका देताच त्यांनी खुनाची कबुली दिली. पत्नीचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिला कायमचे संपविल्याचे त्यांनी पोलिसांसमोर कबूल केले आहे.
या प्रकरणी अधिक तपासाअंती पत्नीला मारण्यासाठी वापरलेले पुरावे लपून ठेवल्याचेही पती विनोद नाईक याने सांगितले. त्यानुसार खुनातील विनोदचा साथीदार ऋतुराज इंगवले याला पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी नेले. मृतदेह फेकलेल्या ठिकाणी काही अंतरावर झाडीत लपून ठेवलेला महिलेचा मोबाईल त्यांने दाखविला. तेथून पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला. मृतदेह ओढण्यासाठी वापरलेली दोरी मृतदेह फेकलेल्या ठिकाणावरून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असेलल्या तीलारीच्या पुच्छ कालव्यात नेऊन फेकली होती. त्या ठिकणी जाऊन ती जागा ऋतुराज इंगवले यांच्याकडून पोलिसांनी दाखवून घेतली. ज्या स्कार्पने खून करण्यात आला होता तो स्कार्प मृतदेह ओढण्यासाठी अपुरा पडत होता. म्हणून या दोघांनीही त्या स्कार्पला दोरी बांधून मृतदेह ओढत नेला होता. जप्त केलेल्या दोरीला स्कार्पचे तुकडेही लागलेले आहेत. तसेच या प्रकरणी अजून काही पुरावे हाती लागतील काय या दिशेने तपास चालू असल्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
दोन्हीं पुरावे पोलिसांनी पंचांच्या समक्ष जप्त केले आहेत. यावेळी घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी आरोपी
ऋतुराज इंगवले याला घेऊन पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलिस रामचंद्र मळगावकर, वसंत देसाई, सामजिक कार्यकर्ते मायकल लोबो गेले होते.

पत्नीला जेवणाला नेण्याच्या बहाण्याने पती विनोद नाईक व त्याच्या साथीदाराने दोडामार्ग येथे आणले होते. तिचा कायमचा काटा काढायचा हा त्यांचा पूर्वनियोजित कट होता. त्या तयारीनिशी दोघेही दोरी घेऊन आले होते. गोव्यात चांगली हॉटेल्स असतानाही जेवणासाठी त्यांनी दोडामार्ग निवडले. फक्त जेवणासाठीच आले असते तर येथील बाजारपेठेत जेवून ते माघारी जाऊ शकले असते. परंतु दोडामार्ग बाजारपेठेपासून तिलारीच्या दिशेला पंधरा किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी तिला घेऊन गेले. तेथेच त्याने आपल्या पत्नीला यमसदनी पाठविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − three =